आखातातील ओमान देशात ढगफुटीत माजलगावचे खान कुटुंबीय बेपत्ता


सुधीर नागापुरे, माजलगाव

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या पुरात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शनिवार दिनांक 18 रोजी घडली. आखातातील ओमान देशातील मस्कत येथे नोकरीनिमित्त असलेल्या आपल्या मुलास ते भेटण्यासाठी गेले होते. या दुर्घटनेत मुलगा सरदार कारमधून बाहेर पडल्याने सुखरुप असून इतर सात जणांचा तेथील प्रशासन हेलिकॉप्टरद्वारे परिसरात शोध करत आहे. तसेच बेपत्ता झालेल्या शेकडो लोकांचा शोध घेण्यात येत आहे.

खैरउल्ला खान सत्तार खान (52) हे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील बुखारी शाळेतील माजी शिक्षक आहेत. खान आपल्या पत्नीसह ओमान देशात मस्कत येथे आय बी अल हैथम मेडिकल सेंटर येथे नोकरीस असलेला मुलगा सरदार खान यास भेटण्यासाठी दिनांक 6 मे रोजी माजलगाव येथून गेले होते. शनिवार दिनांक 18 रोजी ते आपला मुलगा सरदार, सून व तीन नातवंडे, चार वर्षीय मुलगी, दोन वर्षे मुलगा, 22 दिवसांचा एक मुलगा अशी सर्व मिळून एका कारमध्ये पर्यटन स्थळ असलेल्या ‘वादी बीन खालिद’ येथे जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी वारे सुटले. काही क्षणातच जोरदार धुके पसरून मोठा पाऊस झाला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होऊन हा परिसर जलमय झाला.

यावेळी खान कुटुंबीयांपैकी सरदारखान हा गचके बसत का आहेत हे पाहण्यासाठी गाडीबाहेर उतरला. त्याच वेळी पाण्याचा प्रचंड झोत गाडीच्या आतमध्ये शिरला गाडीला वाहून घेऊन गेला. दरम्यान गाडीबाहेर आलेला मुलगा कसाबसा पोहोचत एका झाडकडे सरकला व फांदीला धरून ठेवल्याने तो सुखरूप वाचला. त्यामुळे या दुर्घटनेची माहिती बाहेर कळली. या घटनेने देशात हिंदुस्थानी उपखंडातून याठिकाणी गेलेले अनेक पर्यटक अडकून पडकल्याची माहिती मिळत आहे तर शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत. ओमान सरकारकडून हेलिकॉप्टरद्वारे शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान येथील राज गल्लीत राहणाऱ्या खान कुटुंबातील सदस्य व नातेवाईक चिंतेत असून याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित मदतीसाठी ओमान देशास संपर्क साधावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.