उपवासाची पुरी-भाजी

साहित्य – चार मोठे बटाटे, दोन वाट्या राजगिर्‍याचे पीठ, दोन वाट्या साजूक तूप, एक चमचा जिरे, चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, एक चमचा किसलेले आले, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, ५-६ कढीपत्त्याची पाने, अर्धी वाटी खोवलेला ओल्या नारळाचा चव.

भाजीची कृती – बटाटे उकडून घ्या. त्यांच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्या. गॅसवर एका कढईत साजूक तूप गरम करून घ्या व त्यात जिरे टाका. जिरे चांगले तडतडले की मग हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे, ५-६ कढीपत्त्याची पाने आणि किसलेले आले घालून पुन्हा दोन मिनिटे चांगले परतून घ्या. बटाट्याच्या बारीक चिरलेल्या फोडी व चवीनुसार मीठ व चिमूटभर साखर घालून झार्‍याने भाजी खाली-वर हलवून मिक्स करा. कढईवर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या. झाकण काढून भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा झाकण ठेवा.

पुऱ्या तयार करण्याची कृती – परातीत राजगिर्‍याचे पीठ घेऊन त्यात चिमूटभर मीठ व दोन चमचे साजूक तुपाचे मोहन घालून नेहमीच्या पुर्‍यांसाठी भिजवतो त्याप्रमाणे घट्ट पीठ भिजवा व १० मिनिटे पातळ सूती कपड्याने झाकून ठेवा. नंतर पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्या व नेहमीसारख्या पुर्‍या लाटून साजूक तुपात टाळून काढा.