पालिका मंडयांतील गाळय़ांचे भाडे दुप्पट!

पालिका मंडयांतील गाळय़ांच्या भाडय़ात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. तब्बल १७ वर्षांनी ही भाडेवाढ करण्यात आली आहे. ग्राहक आणि व्यावसायिकांना दर्जेदार सोयीसुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

mandai-1

स्थायी समितीच्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे गाळेधारकांना यापुढे वार्षिक शुल्क ४०० रुपये भरावे लागणार आहेत. यापुढे दरवर्षी १० टक्के दरवाढ केली जाणार आहे.

mandai-2

पालिका मंडयांमध्ये विक्रेते आणि ग्राहकांच्या सोयीसाठी वीज, पाणी, शौचालय अशा सुविधा दिल्या जातात. यासाठी पालिकेला मोठय़ा प्रमाणांवर खर्च करावा लागतो. यामध्ये पालिका मंडयांवर वर्षाला ७० कोटी ७० लाख रुपये खर्च करते, मात्र या गाळय़ांमधून केवळ १७ कोटी ८० लाखांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे ही भाडेवाढ करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. अखेर या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी देत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी जाहीर केले. वाढलेली महागाई आणि प्रस्तावित सुधारणांसाठी भाडेवाढीच्या प्रस्तावाला पाठिंबा देत असल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले. मात्र ही भाडेवाढ करताना प्रशासनाने नागरिक आणि विक्रेते यांना चांगल्या सुविधा मिळतात की नाही यावर देखरेख ठेवावी अशी मागणीही त्यांनी केली.