देवळीवणी धरणातून पाणी न मिळाल्याने शेतकरी नाराज

2

सामना ऑनलाईन, कळवण

तालुक्यातील अंबिका ओझर येथील विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहेत. यंदा कोणत्याच शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाच्या लेखी आश्वासनानंतरही देवळीवणी धरणातून अंबिका ओझर ग्रामस्थांना शेतीसाठी पाण्याचे आवर्तन न मिळाल्याने येथील शेतकऱयांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांत पाणी न मिळाल्यास पुन्हा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

पिकांना शेवटचे पाणी न मिळाल्यास पैसे, वेळ, मेहनत व पीक वाया जाणार आहे. धरणात हक्काचे आरक्षित पाणी मिळावे या मागणीसाठी शेतकऱयांनी 5 फेब्रुवारी रोजी मानूर येथील सहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनांना शिवसेना कळवण तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी पाठिंबा देत तहसीलदार कैलास चावडे, सहाय्यक अभियंता अभिजित रौंदळ यांच्याशी चर्चा करून शेतकऱयांची अडचण ओळखून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने दखल घेत नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत 11 फेब्रुवारी रोजी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते.

अभोणा पोलीस व पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाणी सोडण्यासाठी गेले असता  मोरीजवळ काही स्थानिकांनी वाळूच्या गोण्या, दगड, गोटे टाकून ठेवले होते. हे सर्व साहित्य पाटबंधारे विभागाने जेसीबी मशीनच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात बराच वेळ गेल्याने व स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने त्या दिवशी पाणी सोडता आले नाही. त्यामुळे अंबिका ओझर येथील शेतकऱयांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांत पाणी न मिळाल्यास पुन्हा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा या वेळी रामदास खिल्लारी, सरपंच गीता खिल्लारी, इंदिरा भोये, पोलीस पाटील मन्साराम गांगुर्डे, विक्रम भोये, पांडुरंग भोये, कांतीलाल भोये, पंढरीनाथ भोये, वामन भोये, रमेश बढावे, साहेबराव भोये, एकनाथ भोये, बुधा मांडवी, भाऊसाहेब भोये, रामचंद्र भोये, काशीराम जोपळे, भाऊराव भोये आदींनी दिला आहे.

स्थानिक नागरिकांनी दहा फूट दगड, लाकडे, सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये माती भरून धरणाकडून पाणी सोडण्याच्या विहिरीकडे जाणाऱया चारीत टाकल़े  त्यामुळे पाणी सोडता आले नाही. विहिरीतील दगड काढण्यासंदर्भात तांत्रिक विभागाशी पत्रव्यवहार केला आहे व धरणावर हे कृत्य करणाऱया अज्ञात व्यक्तीविरोधात अभोणा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे-अभिजित रौंदळ, सहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग