गटशेती ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली

>>डॉ. भगवानराव  कापसे<<

तीस वर्षांच्या अथक प्रयत्नातून जालना, संभाजीनगर, बुलढाणा जिल्हय़ातील एकूण २० गावांमध्ये गटशेती बहरली आहे. एकत्रित प्रयत्न आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेती आणि गाव परिसराचा शाश्वत आर्थिक विकास होऊ शकतो हे शेतकऱ्यांनी स्वतःच्या परिश्रमातून दाखवून दिले आहे.

नवी दिल्लीमधील एका चर्चासत्रामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. काडर यांना प्रश्न विचारला की, हिंदुस्थानातील लहान शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. अमेरिकेत मात्र अशी परिस्थिती नाही. याचे कारण काय? त्यावर आम्हाला उत्तराची अशी अपेक्षा होती की, हिंदुस्थानमध्ये शास्त्रीय पद्धतीने शेती करत नाही. पाणी कमी आहे, जमीन हलकी आहे. परंतु त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिले ते म्हणजे, ‘‘तुमच्या देशात प्रति शेतकरी सरासरी दोन एकर जमीन वाटय़ास येते, तर अमेरिकेमध्ये हीच जमीनधारणा सरासरी प्रति शेतकरी सहा हजार एकर आहे’’ या एका वाक्यातून आम्हाला हिंदुस्थानातील शेतीच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले.

आपल्याकडे जमीन कमी, सिंचनासाठी शाश्वत पाणी नाही. बाजारभावामध्ये अनिश्चितता, शासनाचा मोठय़ा प्रमाणात भाव पाडण्यासाठी होत असलेला हस्तक्षेप, शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे अज्ञान, अचूक तंत्रज्ञानाचा अभाव, नैसर्गिक आपत्ती इत्यादींमुळे शेती उत्पादनात अनिश्चितता आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोणताही धोका पत्करण्याची क्षमता नाहीशी होते. शेतकऱ्याला आर्थिक व सामाजिक स्तरावर फारसा मान राहात नाही. मात्र अशाही परिस्थितीत सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात सर्व स्तरांवर शेतकऱ्यांना देशांतर्गतच्या नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करणे आवश्यक आहे. या विकसित होत जाणाऱ्या बाजारपेठांचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी उपाययोजना शोधताना गटशेतीचा नवा सशक्त पर्याय पुढे आला. शेतीविकासातून ग्रामसमृद्धी साधता येईल या हेतूने सन १९८६मध्ये गटशेतीची चळवळ राबविण्याचा संकल्प केला. गटशेती म्हणजे नुसता एखाद्या फळपीक, भाजीपाला, कापूस किंवा कोणत्याही एका पिकाचा गट नसून, खेडय़ातील सर्व स्तरांतील आणि सर्व जाती-धर्मांच्या गावकऱ्यांचा हा गट आहे. सर्वांनी मिळून आपापल्या शेतात एकच पीक शास्त्रीय पद्धतीने उच्च दर्जा, मोठय़ा प्रमाणात उत्पादित करणे, त्याचे मूल्यवर्धन, प्रक्रिया व विक्री तसेच निर्यात करणे हे सूत्र आम्ही ठेवले. गावाचा सर्वांगीण शाश्वत विकास ही गटशेतीची मध्यवर्ती संकल्पना आहे.

उद्दिष्टे :

> सर्व छोटे शेतकरी समूहाने एकत्र आणणे

> सामूहिकपणे ‘एकच एक पीक पद्धती’ मोठय़ा क्षेत्रावर राबविणे. प्रत्येक शेतकऱ्याचे छोटे छोटे क्षेत्र एकाच पिकाखाली आणणे

> सामूहिक पीक पद्धतीत अचूक उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्वक उत्पादक घेणे

>  एकत्रित मोठय़ा प्रमाणात निर्यातक्षम उत्पादन घेऊन बाजारपेठेत उतरणे

> ठिबक व इतर सूक्ष्म सिंचनाद्वारे कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्राचे सिंचन व त्याद्वारे उत्पादकता व दर्जा वाढवणे

> गटशेतीतील शेतकऱ्यांच्या सर्व क्षेत्रामधील उपलब्ध जलसंपत्तीचा साठा करून काटकसरीने वापर करणे.

जालना जिह्यातील घनसावंगी तालुक्यातील जिरडगावात सन २०००मध्ये शेतकऱ्यांनी इंडिको फलोत्पादन शेतकरी संघाची स्थापना केली. या गटशेतीचा प्रयोग अकोला देव व परिसरातील शेतकऱ्यांनी पाहिला. येथील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम ‘केसर’ आंब्याची सुमारे ४५० एकर आणि मोसंबीची ६५० एकरावर सामूहिक गटशेतीद्वारे आधुनिक पद्धतीने लागवड केली. मात्र पुढे पावसाने धोका दिला. पाणी कमी पडल्यामुळे अर्ध्याअधिक आंबा आणि मोसंबी बागा वाळून गेल्या. मात्र जिरडगावच्या गटशेतीतील शेतकऱ्यांच्या एकीतून झालेला बदल पाहून अकोला देव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी भारावून गेले. त्यांनी लगेचच अकोला देव परिसरात ‘ऍग्रो इंडिया’ गटशेती संघाची स्थापना केली.

जालना जिल्हय़ातील जमीन मध्यम ते हलकी. जाफराबाद, भोकरदन, बदनापूर हे तालुके कायम दुष्काळी, पावसाची वार्षिक सरासरी ६७२ मि. मी. बऱ्यापैकी पाऊस झाला तरी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मारामार. या भागातील पीक पद्धती म्हणजे कापूस, मका, काही प्रमाणात भाजीपाला, रब्बी ज्वारी, मिरची इत्यादी. अशा परिस्थितीत ‘ऍग्रो इंडिया’ गटशेतीची स्थापना हा मोठा धाडसी प्रयोग होता. आता नुकतीच ‘ऍग्रो इंडिया फार्मर प्रोडय़ुसर कंपनी’ची स्थापना करण्यात आली. या गटशेतीमध्ये कृषी खाते, जिल्हा परिषद, बँका इत्यादींचा सक्रिय सहभाग आहे.

२००४पासून अकोला देव आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक बैठका घेण्यात आल्या. परिसराची पाहणी, माती परीक्षण करण्यात आले. साधनसामग्री, पाण्याची उपलब्धता याचा अभ्यास करण्यात आला. मोसंबीचे यशस्वी उत्पादन घेण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा याबाबत चर्चा झाली. या बैठकांमधून आम्ही गटशेतीची संकल्पना परिसरातील गावांची कृषी हवामान परिस्थिती आणि गरज लक्षात घेऊन समजावून सांगितली. तेव्हा अकोला देव, जवखेडा (ठेंग) आणि तपोवन या गावात २००५ पासून सुमारे २५० एकरांवर आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून मोसंबीची लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांनी आंध्र प्रदेशातून जाऊन मोसंबीची कलमे एकत्रितपणे आणली. या मोसंबीची वाढ अप्रतिम आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने काही बागा वाळल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांनी हार मानलेली नाही. गटशेतीच्या माध्यमातून पहिला कापसाच्या अतिघन लागवडीचा प्रयोग अकोला देव येथील लक्ष्मण सावडे आणि देळेगव्हाण येथील बाळासाहेब कापसे यांच्या शेतीत २००४ मध्ये करण्यात आला. पहिल्याच प्रयोगात दोघा शेतकऱ्यांना एकरी २३ क्विंटलपेक्षाही जास्त कापसाचे उत्पादन मिळाले. या प्रयोगातून प्रेरणा घेऊन परिसरात दुसऱ्या वर्षी मोठय़ा प्रमाणात अतिघन पद्धतीने ठिबकवर मे महिन्याच्या शेवटी कपाशी लागवड करण्यात आली. छोटे-छोटे  शेतकरी एकत्र येऊन गटशेती करत असल्याने तज्ञांचे मार्गदर्शन सहज उपलब्ध झाले. यात आता हळूहळू मोठय़ा प्रमाणात डाळिंब, सीताफळ, संरक्षित शेती, रेशीम उद्योगांचा समावेश होत आहे. गटशेतीत दरवर्षी एक एक दोन दोन गावे समाविष्ट होत गेली. आता गटशेती जालना, संभाजीनगर, तसेच बुलढाणा जिल्हय़ातील एकूण २९ गावांचा समावेश आहे.

(लेखक गटशेती प्रवर्तक व फळबागतज्ञ आहेत.)