खर्चापेक्षा उत्पन्न कमी येणार म्हणून शेतकऱ्याने पीक पेटवले

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नागपूर

सात एकर शेतजमिनीवर सोयाबीन पिकांची पेरणी केल्यावरसुद्धा सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. पेरणी, कापणी व मळणीचा खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने व त्यातून काहीच मिळकत मिळणार नाही, हे लक्षात येताच वैतागलेल्या शेतकऱ्याने सोयाबीन गंजी पेटविली, ही घटना नुकतीच अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील असदपूर येथे उघडकीस आली.

असदपूर येथील उमेश केशवराव मुंदाने या युवा शेतकऱयाने कसबेगव्हाण रस्त्यावर सात एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. यावर्षी तरी चांगले पीक येईल, या अपेक्षेवर पेरणी ते कापणीपर्यंत त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. कापणी केल्यावर सोयाबीनच्या शेंगा पोचट निघाल्या. मळणी यंत्राचे भाडे सुद्धा निघणार नव्हते. त्यामुळे कुटाराचे करायचे तरी काय, असा प्रश्न त्याला पडला. सात एकर शेतजमिनीसाठी बियाणे, खत, डवरणी, फवारणी, निंदण आदीवर जवळपास ४० हजार रुपये खर्च झाले. कापणी केल्यावर मळणीसाठी अकराशे रुपये प्रतिएकरप्रमाणे एकरी भाव सांगितला. मात्र गंजीतून एवढे सोयाबीन निघणार नव्हते. त्यामुळे निराश होऊन उमेशने आपले पीक पेटवून दिले.