बैल पोळ्यालाच शेतकर्‍याची आत्महत्या


सामना प्रतिनिधी । यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. पोळा सणाच्या दिवशीच या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव विजय पारधी असून यवतमाळ तालुक्यातील मनपूर येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

विजय पारधी यांच्यावर ८० हजाराचे कर्ज होते. पाच एकर जमीन त्यांच्या मालकीची होती. गेल्या वर्षी बोंड अळीमुळे त्यांना नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई बँकेत आली होते, पण त्यांच्या खात्यात जमा झाली नव्हती. या नुकसान भरपाईसाठी गेले आठ दिवस ते बँकेत हेलपाटे घालत होते. पोळा सण येऊनही नुकसान भरपाई न मिळाल्याने निराश होऊन त्यांनी शेतातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पारधी यांच्या पश्चात चार मुली आहेत. त्यापैकी दोन मुलींची लग्न झाले असून दोन मुली शिकत आहे. पोळा सणाच्या दिवशी त्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.