…अन डोळ्यादेखत ‘तो’ वाहून गेला

सामना प्रतिनिधी । देवरुख

मुसळधार पावसामुळे आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात वाहुन गेल्याने संगमेश्वर तालुक्यातील बोंड्ये येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना घडली. दुपारी त्यांचा मृतदेह अर्धा किमी अंतरावर सापडला. रमेश लक्ष्मण गुरव (५५ ) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकारामुळे तालुक्यात पावसाच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे.

रमेश रविवारी सकाळी शेतात काम करत असताना मुसळधार पावसामुळे तयार झालेल्या लोंढ्यात वाहून गेले. शेजारी शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी हा प्रकार पाहून आरडा ओरड केली मात्र पाण्याच्या प्रवाहात ते गायब झाले. तातडीने ग्रामस्थांनी शोधकार्य सुरू केले. दुपारी २ च्या सुमारास रमेश यांचा मृतदेह ते वाहून गेलेल्या ठिकाणापासून अर्धा किमी अंतरावर सापडला. संध्याकाळी देवरुख ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. अचानक घडलेल्या या प्रकाराने गुरव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

रविवार सकाळी ८ ते सोमवार सकाळी ८ या २४ तासात संगमेश्वर तालुक्यात केवळ ३४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असुन आत्तापर्यंत एकूण ११९८ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे बावनदी, सोनवी, शास्त्री, सप्तलिंगी, काजळी, असावी, गडनदी या नद्या धोक्याच्या पातळीवर येउन वाहु लागल्या आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे.