पावसाअभावी पिके करपली, बळीराजा संकटात

सामना प्रतिनिधी । नांदगाव

पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र त्यानंतर पावसाने अक्षरशः पाठ फिरवली आहे. अर्ध्यावरच पाऊस गायब झाल्याने शेतातील नव्याने उगवलेली पिके करपू लागली आहेत. नांगरणी, कोळपणी झाल्यानंतर पाऊसच पडला नसल्यामुळे शेतीत झालेला खर्च वाया गेला आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून त्याचे डोळे सरकारी मदतीकडे लागले आहेत.

पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्याही जाणवू लागल्या आहेत. आजमितीस 7 टँकरद्वारे काही भागात पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचे टँकर सुरू करावे म्हणून ग्रामीण भागातून तसेच प्रस्तावही येऊ लागले आहेत. तालुक्यातील काही भागात उगवलेले पीक नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पीक पंचनाम्यानाही अद्याप सुरुवात झालेली नसल्याने शेतकरी संकटात सापडत आहे. तालुक्यातील विविध पक्ष, संघटनांनी तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी केली असून तसे निवेदनदेखील शासन दरबारी सादर केले आहेत. शेतकऱयाला शासनाने आर्थिक व मानसिक आधार देण्याची गरज आहे. योग्य वेळी आधार मिळाला तरच शेतकरी या अस्मानी संकटातून बाहेर निघेल अशी अपेक्षा आहे.

तालुक्यातील पीकनिहाय सद्यस्थिती
मका- हे पीकवाढीच्या अवस्थेत असून पावसाअभावी व पडलेल्या खंडामुळे तालुक्यातील बागायती क्षेत्र वगळता उर्वरित सर्वच मका पीक क्षेत्र हे पाण्याच्या ताणामुळे सुकण्यास सुरुवात झाली आहे. कायमस्वरूपी मृतावस्थेकडे पिकांची वाटचाल आहे. पाऊस न झाल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

बाजरी – पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटलेली असून पाने गोळा होत आहे व पीक सुकण्यास सुरुवात झालेली आहे.

कपाशी – पीकवाढीच्या अवस्थेत असून पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटलेली आहे. हलक्या जमिनीवरील कपाशी पीक सुकण्यास सुरुवात झाली आहे. अशीच परिस्थिती कडधान्य पिकांची झालेली आहे.

चालू खरिपातील पिके पेरणी (हेक्टरमध्ये)
सरासरी क्षेत्र –63,992, पेरणी क्षेत्र – 53,686, टक्केवारी – 84 टक्के

तालुक्यातील पर्जन्यमान
जून- 58.52 मिमी, जुलै- 24.2 मिमी

मंदिर, मशिदीत प्रार्थना
नांदगाव तालुक्यातील सर्वच मंदिरांत परमेश्वराला साकडे घालून पावसासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. मुस्लिम बांधवांनी पावसासाठी विशेष नमाज अदा करून पाऊस पाडण्यासाठी दुआ मागितली. पाचवीलाच पुजलेल्या दुष्काळामुळे तालुक्यातील हजारोंचा पोशिंदा मात्र सर्वच बाजूंनी संकटात सापडला आहे.

7 ते 8 दिवसांत पाऊस पडला तर कांदे, गहू, हरभरा हि खरिपाची पिके घेता येतील. बाजरी, मका, मूग, भुईमूग, मठ आदी कडधान्य पावसाअभावी करपली असून पिकांची वाढही झाली नाही. त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे. खरीप पिकांसाठी आजही जोरदार पावसाची अपेक्षित आहे. – अशोक चोळके, शेतकरी मोरझर.