सिक्कीममध्ये शेतकऱ्यांना पेन्शन लागू

1
sikkim-farmer

सामना ऑनलाईन। गंगटोक

सिक्कीममध्ये गेली दोन तपे सत्तेवर असलेल्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटच्या सरकारचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी 50 वर्षे वयावरील शेतकऱ्यांना दरमहा एक हजार रुपयांची पेन्शन सुरू केली आहे. शेतकऱ्यांना पेन्शन लागू करणारे सिक्कीम हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

सिक्कीम सरकारच्या या पेन्शनचा लाभ एक हजार शेतकऱ्यांना होणार आहे. ही योजना यंदाच्या ऑगस्ट महिन्यात अमलात आली. मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनी सरमसा येथे झालेल्या जैविक शेती उत्पादक तथा राज्यस्तरीय पंचायत संमेलनात 78 शेतकऱ्यांना पेन्शनच्या रकमेचे नुकतेच वाटप केले.

जैविक शेती करणारे राज्य

सिक्कीममध्ये संपूर्ण शेती जैविक पद्धतीने म्हणजे रासायनिक औषधे-खतांशिवाय केली जाते. तिथे रासायनिक खते-औषधांचे एकसुद्धा दुकान नाही. त्या राज्यातील जैविक शेतीमधील अन्नधान्याला जगभरातून मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक पटींनी वाढले आहे.