दिल्लीत २० नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी देशभरातील शेतकरी संघटना एकवटल्या असून २० नोव्हेंबरला सर्व शेतकरी दिल्लीत धडकणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह १८० शेतकरी संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्रासह देशातील विविध भागातील शेतकरी सरकारवर नाराज आहेत. वर्षभरापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी व योग्य हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे शेतकरी बांधवही सुखावले होते. आज ना उद्या सरकार आपल्याला न्याय देईल या भाबड्या आशेवर शेतकरी जगत होते. पण अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले आणि शेतकऱ्यांच्या होत्या नव्हत्या त्या आशा धूसर झाल्या. पण त्यानंतरही सरकारतर्फे योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. यामुळे मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान कर्जमाफी आणि हमीभावावरुन शेतकऱ्यांनी देशभरात अनेक आंदोलने केली. मध्य प्रदेशात मंदसौर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याविरोधात किसान संघर्ष समितीने देशभरात १० हजार किलोमीटरची पदयात्रा काढली होती. या पदयात्रेची सांगता दिल्लीत होणार आहे. यामुळे हीच वेळ साधून शेतकरी संघटनांनी २० नोव्हेंबरला दिल्लीत संसद रस्त्यावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.