पिंपळगावला तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । पिंपळगाव बसवंत

नैसर्गिक आपत्तींमुळे सलग तीन वर्षे द्राक्षबागेचे झालेले नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी गणेश किसन मोरे यांनी आज मध्यरात्री आत्महत्या केली.

गणेश मोरे (३०) यांनी घराजवळील शेडमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली, सकाळी ही घटना उघडकीस आली. घरातील कर्त्या पुरुषानेच जीवन संपविल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांची अवघी अडीच एकर जमीन आहे. त्यांच्यावर सोसायटीचे व हातउसने असे बारा लाख रुपयांचे कर्ज होते. द्राक्षाला मिळणारा मातीमोल भाव आणि मागील वर्षी व्यापाऱ्याने आर्थिक फसवणूक केल्याने ते व्यथीत झाले होते. आई, पत्नी, दोन मुले, बहीण व दोन भाचे यांची त्यांच्यावर जबाबदारी होती, घरखर्च भागविणेही कठीण झाल्याने नैराश्यातून त्यांनी जीवन संपविले.