कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, गळफास घेऊन संपवले जीवन

नापिकी, कर्ज व रखडलेला भूसंपादनाचा मावेजा यामुळे वैतागून जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील शेतकऱ्याने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. रामदास प्रभाकर जानापुरे (वय – 50) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे कर्जाला कंटाळून महिन्याभरात 4 शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे.

रामदास प्रभाकर जानापुरे यांनी मंगरूळ येथील शिवारात हाशम महेबुब पटेल यांच्या शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्वात आई, वडील, एक भाऊ, दोन लहान मुले असा परिवार आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मिटकरी हे करीत आहेत.

मंगरूळचे पोलीस पाटील आक्रम दावल पटेल यांनी पोलिसांना खबर दिल्यावरुन पोलीस ठाणे जळकोट येथे आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबधी तलाठी स्वप्नील बेंबडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता रामदास जानापुरे यांनी कर्ज, नापिकी व भूसंपादनाचा मावेजा मिळत नाही या कारणांनी रामदास जानापुरे यांनी आत्महत्या केल्याची लेखी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली असल्याचे सांगितले.