परभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र थांबेना, वांगी येथील शेतकर्‍याची आत्महत्या 

7
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । परभणी

शासनाने शेतकर्‍यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी आवाहन करुनही परभणी जिल्ह्यात शेतकर्‍यांची आत्महत्या सत्र काही केल्या थांबेना, अशी अवस्था झाली आहे. आज एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा परभणीत खळबळ उडाली आहे.

परभणी तालुक्यातील वांगी येथील रहिवासी तुकाराम गलांडे (३७) या तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.  परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍याच्या आत्महत्येचे सत्र थांबायला तयार नाही. शासन मदतीला धावून येत नाही अशा सगळ्या विवंचनेत परभणी जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. कुठलाच मार्ग उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील वांगी येथील शेतकरी तुकाराम गलांडे यांनी  शहरालगत एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सततच्या नापिकीमुळे आणि शेतीतील उत्पन्न कमी मिळत असल्याच्या कारणावरून निराश झालेल्या शेतकर्‍याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.  कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेतून शेतकरी टोकाची पोऊल उचलत आहे. पीक विम्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. यासंदर्भात अनेक आंदोलनेही झाली. परंतु पीकविमाचा लाभ मिळत नाही. अनेक समस्यांनी शेतकर्‍यांना घेरले आहे. परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे, परंतु उपाययोजना मात्र अजुनही करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबेनात. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.