संतापाचा उद्रेक मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर पोहोचला; धाराशीवच्या शेतकऱ्याची आत्महत्येची धमकी

सामना ऑनलाईन । मुंबई

शेतकऱ्यांची ऐतिहासिक कर्जमाफी, शेतकऱ्यांना हमीभाव देऊ या सरकारी आश्वासनानंतरही शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्षात काहीच पडत नसल्याचे पडसाद आज मंत्रालयात उमटले. महिनाभरापूर्वी शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्न ताजा असतानाच आता आज धाराशीवमधील एका तरुण शेतकऱ्याने मंत्रालयाच्या ऍनेक्स बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न केला. सायंकाळी चार वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत तब्बल दीड तास रंगलेल्या या आत्महत्यानाट्यात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, रणजीत पाटील आणि त्यानंतर विनोद तावडे यांच्या शिष्टाईनंतर या तरुणाला खाली उतरवण्यात यश आले.

सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नसल्याचे सांगत ज्ञानेश्वर साळवे हा तरुण सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे पोहचला, मात्र दोघेही मंत्रालयात नसल्याने हा तरुण ऍनेक्स बिल्डिंगमधील सातव्या मजल्यावर पोहोचून तेथील खिडकीतून बाहेर पडून सज्जावर पोहोचला. ‘स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा’, ‘हमीभाव द्या’ अशा घोषणा देत हा तरुण आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागताच मंत्रालयात सुरक्षेवर असलेल्या पोलिसांचे धाबे दणाणले.

तरुणाने चिठ्ठी खाली फेकली
तरुणाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या. साळके याने मोबाईल नंबर कागदाकर लिहून तो खाली फेकला. त्या मोबाईलवर पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी तुमच्याशी बोलणार असे सांगताच पोलिसांनी तिथे उपस्थित पत्रकार प्रमोद डोईफोडे यांच्याकडे मोबाईल दिला. याच वेळी या तरुणाने तिथे पडलेला काचेचा तुकडा घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भेट देतील असे त्याला पत्रकाराने सांगितले. मात्र त्यानंतरही अर्धा तासात राज्यमंत्रीही न पोहोचल्याने तरुणाने पुन्हा आत्महत्येची धमकी दिली. अखेर पाच वाजण्याच्या सुमारास गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, रणजीत पाटील आणि त्यांच्यापाठोपाठ शिक्षणमंत्री विनोद तावडे तिथे पोहोचले.

अग्निशमन दलाचीही धावाधाव…
मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांशिवाय कोणाशी बोलणार नाही, असा पवित्रा घेतलेल्या साळवेच्या आत्महत्येच्या धमकीमुळे सारी यंत्रणा कामाला लागली होती. रागाच्या भरात साळवेने उडी मारली तर त्याचे काही बरेवाईट होऊ नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला झेलण्याची तयारीही करून ठेवली होती. मंत्रालयातील हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेकजण हा थरार आपल्या मोबाईलमध्ये कैद करून घेताना दिसत होते. याविषयी बोलताना विनोद तावडे म्हणाले, या तरुणाच्या मागण्या रास्त असून मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांसमोर त्या ठेवल्या जातील.

माझ्यावर गुन्हा दाखल करू नका
माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल करू नका, मला नातेवाईकांच्या ताब्यात द्या अशी मागणी करीत या तरुणाने लेखी आश्वासन मागितले. त्यानंतर लेखी आश्वासनाचे पत्र त्याच्या हाती दिल्यानंतर या तरुणाला सातव्या मजल्यावरील सज्जावरून उतरवण्यात या मंत्र्यांना यश आले. तरुणाच्या मागणीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. त्याचप्रमाणे रात्री उशिरा पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले.

शेतकऱ्यांना हमीभाव, कृष्णा खोऱयातील शेतकऱ्यांचे पुनर्वसन करा!
शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे. कृष्णा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षे रखडला आहे. त्यांचे पुनर्वसन करा अशी मागणी या तरुणाने केली. धाराशीवमध्ये आपली स्वतःची तीन एकर शेती असून त्याला म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नसल्याचेही त्याने यावेळी मंत्र्यांना सांगितले.

मंत्रालयात एकच खळबळ
तरुणाच्या आत्महत्या प्रयत्नाची बातमी मंत्रालयात पसरताच एकच खळबळ उडाली. ऍनेक्स इमारतीसमोरील पटांगणात एकच गर्दी झाली होती. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र मी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांशीच बोलणार यावर हा तरुण अडून बसला. ते आल्याशिकाय मी खाली उतरणार नाही, त्यांना भेटू द्या, अन्यथा मी येथूनच उडी मारेन अशी त्याने धमकी दिली.