पेरण्या कसल्या करता?… गोळ्या खा, सरकारची दडपशाही

सामना प्रतिनिधी । कल्याण

कश्मीरात अतिरेक्यांवर रोखलेल्या पॅलेट गन आज नेवाळीतील आंदोलक शेतकऱयांवर चालवण्याचा पराक्रम राज्य सरकारने केला. स्वतःच्याच जमिनीत पेरण्या करण्यासाठी निघालेल्या शेतकऱयांवर पोलिसांनी दडपशाहीचा वरवंटा फिरवताच एकच आगडोंब उसळला. पोलिसांनी महिला, वृद्ध, मुले यांना अक्षरशः गुरासारखे झोडपले. एका शेतकऱयाचे डोके फुटले असून तो ज्युपिटर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलीस एवढय़ावरच थांबले नाहीत तर कश्मीरातील अतिरेक्यांवर डागलेल्या पॅलेट गनचा वापरही त्यांनी केला. यात दहा शेतकरी जबर जखमी झाले. नेवाळीतील विमानतळाच्या भूसंपादनावरून पेटलेल्या या वादाच्या ठिणग्या आजूबाजूच्या 16 गावांमध्ये उडाल्या आणि मग उसळला तो आगडोंब. शेतकऱयांनी दगडफेक, तोडफोड करीत पोलीस व्हॅनसह अनेक गाडय़ा पेटवून दिल्या. दरम्यान, याप्रकरणी 29 जून रोजी नवी दिल्लीत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी बैठक आयोजित केल्याचे समजते.

पिढय़ान् पिढय़ा ज्या जमिनीतून सोने पिकविले तेथे पेरण्या करणाऱया नेवाळीतील शेतकऱयांना सरकारने विरोध केल्याने स्थानिक भूमिपुत्रांच्या संतापाचा आज जबरदस्त भडका उडाला. पेरण्या कसल्या करता… ही जमीन तुमची नसून नौदलाची आहे, असा दावा सरकारने केला असून त्यास विरोध झाल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्यात 12 शेतकरी तसेच काही पोलीसही जखमी झाले. नेवाळीवासीयांनी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले असून कल्याणच्या ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. कोणत्याही परिस्थिती आमच्या हक्काची जमीन सोडणार नाही, असा निर्धार शेतकऱयांनी केला आहे.

दुसऱया महायुद्धाच्या काळात ब्रिटीशांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतलेल्या नेवाळीतील शेतकऱयांच्या 1700 एकर शेतजमिनीवर नौदलाने गेल्या काही वर्षांपासून दावा केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तर नौदलाने पोलीस बंदोबस्तात येथे राहुटय़ाच टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱयांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

पाऊस पडल्याने नांगरणी, पेरणी करण्यासाठी शेतात निघालेल्या शेतकऱयांना पोलिसांनी रोखले.त्यामुळे शेतकरी संतापले. ही खबर काही क्षणात नेवाळी, भालसह आसपासच्या सोळा गावात पसरली. त्यांनी संघटितपणे पोलिसांचा विरोध केला. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि पोलिसांनी पॅलेट गनमधून थेट चार फैरी झाडल्या. यात जनार्दन म्हात्रे हा शेतकरी गंभीर जखमी झाला. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, तर अनेक शेतकरी जायबंदी झाले. पोलिसांनी बेछुट लाठीहल्ला करीत शेतकरी आणि गावकऱयांना गुराढोरासारखे चोपले. यात दहा शेतकरी जबर जखमी झाले.

शेतकऱयांवरील अन्यायाची खबर हा हा म्हणता सर्वत्र पसरली आणि पोलिसी अत्याचाराच्या निषेधार्थ आसपासच्या परिसरातील हजारो शेतकरी आणि गावकरी रस्त्यावर उतरले. आंदोलनाचे लोण नेवाळी, मलंगगड, भाल परिसरातील ग्रामीण भागात पसरले. त्यांनी टायर जाळून आणि मोठी झाडे रस्त्यावर टाकून कल्याण-मलंगगड सह अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, नवी मुंबईकडे जाणारे रस्ते बंद केले. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. यावेळी गावकऱयांनी कल्याण-नेवाळी मार्गावरील मोटरसायकली, कार, ट्रक याची तोडफोड करीत काही गाडय़ा पेटवून दिल्या.

सहायक पोलीस आयुक्त लक्ष्य

शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करीत असताना सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी विनाकारण लाठी चार्ज करण्याचे आदेश दिल्याचा आरोप शेतकऱयांनी केला. याच रागातून त्यांनी सुनील पाटील यांच्यासह हिल स्टेशन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मोहन वाघमारे यांना संतप्त जमावाने पाठलाग करुन त्यांना मारहाण केली. पोलिसांच्या दिशेने जमावाने जोरदार दगडफेक केली. पोलीस गाडय़ांची तोडफोड करून या गाडय़ा जाळून टाकल्या. यावेळी 12 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले.

शिवसेना शेतकऱयांना वाऱयावर सोडणार नाही
पालकमंत्र्यांची ग्वाही

नेवाळीच्या शेतकऱयांवर झालेला गोळीबार हा अत्यंत दुर्दैवी असून त्यांचे प्रश्नदेखील समजावून घेण्याची गरज आहे. गेली 75 वर्षे शेतकरी येथील जमिनीतून पीक घेत असून ग्रामस्थांमध्ये सरकार विरोधात मोठय़ा प्रमाणावर असंतोष आहे. मात्र शिवसेना शेतकऱयांना कोणत्याही परिस्थितीत वाऱयावर सोडणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

नेवाळीतील शेतकऱयांच्या आंदोलनाचे वृत्त समजताच एकनाथ शिंदे यांनी तातडीने धाव घेऊन स्थानिकांशी संवाद साधला. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसदेखील केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शेतकऱयांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले आहे तर मुख्यमंत्रीही सकारात्मक आहेत. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सातत्याने पाठपुरावा करीत असून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याशीदेखील चर्चा झाली आहे. राष्ट्रहित व शेतकऱयांचे हित डोळय़ांसमोर ठेवून सर्व सहमतीने मार्ग निघेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

आंदोलकांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंदवणार
पोलिसांवरील हल्ला पूर्वनियोजित होता. या घटनेत पोलिसांच्या तीन गाडया जाळण्यात आल्या असून 12 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर स्वसंरक्षणार्थ पॅलेट गनमधून चार फैरी झाडल्या. आंदोलकांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
– परमबीर सिंह, पोलीस आयुक्त ठाणे.

नौदलाला भिंत बांधण्यास स्थगिती

नेवाळीत घडलेल्या आंदोलनाचे पडसाद दिल्लीपर्यंत पोहोचले. आंदोलनाची दखल संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी घेतली. शेतकऱयांच्या भावना अत्यंत तीक्र आहेत. त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे आणि त्यामुळेच नौदलाला संरक्षक कुंपण उभारण्यास 29 जूनपर्यत स्थगिती देत आहोत, असे भामरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

जखमींवर विविध रुग्णालयात उपचार

जखमी पोलीस आणि शेतकऱयांवर ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींची पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पोलिस आयुक्त डॉ. परमबीर सिंह यांनी भेट घेऊन विचारपूस केली.