व्हिडिओ-शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या गाड्यांवर कापसाच्या फांद्या भिरकावल्या

सामना प्रतिनिधी, यवतमाळ

शेतकऱ्यांची बाजू ऐकून न घेता त्यांना धुडकावणाऱ्या कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि पालकमंत्री मदन येरावार यांची आणि शेतकऱ्यांची बाचाबाची झाली. कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड घोषणाबाजी करत शेतकरी त्यांच्या गाडी समोर आले. मंत्र्यांचा ताफा अडवत त्यांनी सोबत आणलेल्या कापसाच्या झाडाच्या फांद्या मंत्र्यांच्या गाडीवर भिरकावल्या. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत मंत्र्यांची सुटका केल्यानंतर पांडुरंग फुंडकर आणि येरावार नियोजित कार्यक्रम स्थळी रवाना झाले.

यवतमाळमध्ये कृषीमंत्र्यांनी चर्चा करावी असा आग्रह स्थानिक शेतकरी नेत्यांनी धरला होता. मात्र फुंडकरांनी चर्चेला नकार दिला, यावेळी पालकमंत्री मदन येरावार आणि शेतकरी नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यवतमाळ जिल्ह्यात विषारी कीटकनाशक फवारल्याने आतातपर्यंत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण विदर्भात संतापाची लाट पसरली आहे. मुंबईतील दुर्घटनेत जे नागरीक मृत्यूमुखी पडले त्यांना सरकारने १० लाखांची मदत दिली आणि यवतमाळमध्ये शेतकरा दगावला तर त्यांना फक्त २ लाखांची मदत दिली जाते, हा दुजाभाव का असा प्रश्न शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र मंत्र्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे.

शेतकऱ्यांनी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर आणि मदन येरावार यांना कापसाच्या झाडाच्या फांद्या दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्री आणि त्याच्या समर्थकांनी शेतकऱ्यांचे ऐकून न घेता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, यामुळे भडकलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गाड्यांवर कापसाच्या फांद्या भिरकावल्या.