गारपिटीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त

प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । धुळे

धुळे जिह्यात तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे. गारठा आणि हवेतील आर्द्रतेमुळे गहू आणि हरभरा पिकास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणातील गारठा अजून काही दिवस कायम राहिला तर गव्हाच्या ओंबीतील दाणा आणि हरभऱयाचा दाणा भरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना अपेक्षित उत्पन्न येईल. मात्र त्याचवेळी हवामान खात्याने फेब्रुवारीत गारपिटीची शक्यता व्यक्त केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

जिह्यात यंदा बहुसंख्य शेतकऱयांनी रब्बी हंगामात गहू आणि हरभऱयाची पेरणी केली आहे. सध्या वातावरणात अचानक बदल झाला आणि गेल्या चार दिवसांपासून तापमान घसरले आहे. कृषी महाविद्यालयच्या तापमापन विभागाच्या माहितीनुसार सध्या तापमानाचा पारा १० अंशावर आला आहे. त्याचवेळी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सरासरी ८० टक्क्यांवर पोहोचले आहे. गारठा असतांनाच आकाश निरभ्र राहते. त्यामुळे गहू आणि हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

वातावरण असेच काही काळ राहिले तर गव्हाच्या ओंबीतील दाणा आणि हरभऱयाचा दाणा भरण्यास मदत होणार आहे. दाणे वजनदार झाल्यामुळे उत्पादन जास्त येईल. शिवाय अशा वातावरणात पिकांची वाढ जोमदार होते. त्यामुळे शेतकरी सध्या खूश आहेत. परंतु त्याचवेळी हवामान खात्याने फेब्रुवारीत गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे साहजिकच गहू आणि हरभरा उत्पादक शेतकऱयांच्या आनंदाला चिंतेची किनार लागली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार खरोखर फेब्रुवारी महिन्यात गारपीट झाली तर गहू आणि हरभऱयाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होईल. दुर्दैवाने तशी वेळ येऊ नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.