शेतकऱ्यांचा २० नोव्हेंबरला दिल्लीत एल्गार!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शेतमालाला हमीभावासह विविध केवळ आश्वासने देणाऱ्या केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी आता एल्गार पुकारला आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रासह देशभरातील लाखो शेतकरी राजधानी दिल्लीत धडकणार असून, संसद मार्गावर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात १८० शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.

आज देशभरातील विविध राज्यांमधील शेतकरी नेत्यांची बैठक झाली. यावेळी २० नोव्हेंबरला राजधानीत मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत शेतकरी आत्महत्या, दुष्काळ आदी मुद्दय़ांवर चिंता व्यक्त करण्यात आली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी तसेच मेधा पाटकर उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे वर्षात ३४ हजार कोटींचे नुकसान
शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. हमीभावापेक्षा कमी पैसे शेतकऱयांना मिळतात. त्यामुळे वर्षाला शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींचे नुकसान होते, अशी
माहिती भारतीय किसान संघर्ष समितीने दिली आहे.

महाराष्ट्रातून आंदोलनाची सुरुवात
सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. शेतमालाला हमीभाव हे महत्त्वाचे आश्वासन होते. मात्र, मोदी सरकारने आश्वासन पूर्ण न केल्याने महाराष्ट्रात पहिल्यांदा शेतकरी संपावर गेले. या संपाच्या आंदोलनाचा भडका देशातील अनेक राज्यांमध्ये उडाला. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. मंदसौर येथे आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

पंजाब, राजस्थानमध्येही शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मध्य प्रदेशातील अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने हमीभावासाठी मंदसौरपासून १० हजार किलोमीटरची शेतकरी पदयात्रा काढली. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. देशभरातील लाखो शेतकरी २० नोव्हेंबरला राजधानी दिल्लीत धडकणार आहेत.