नांदगावला उन्हाळी कांदा 22 पैसे, तर लाल कांदा 25 पैसे किलो; शेतकरी चिंताग्रस्त


सामना प्रतिनिधी, नाशिक

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी उन्हाळ कांद्याला नीचांकी 22 पैसे किलो, तर लाल कांद्याला 25 पैसे किलो भाव मिळाला. उन्हाळपाठोपाठ नव्या लाल कांद्यालाही मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नांदगाव बाजार समितीत गुरुवारी लाल कांद्याची साडेतीन हजार क्विंटल आवक होती. किमान 25 रुपये क्विंटल म्हणजेच 25 पैसे किलो दर मिळाला. सरासरी 470, कमाल 575 रुपये क्विंटल भाव होता. उन्हाळची आवक अवघी 50 क्विंटल, तर दर किमान 22, कमाल 200 व सरासरी 100 रुपये क्विंटल असे मिळाले. सटाणा व नामपूर बाजार समित्यांमध्ये काल 50 पैसे किलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र, तरीही कांद्याच्या दरात सुधारणा झालेली नाही.

सटाण्यात आज लाल कांद्याची आवक 6 हजार क्विंटल, दर किमान 100, कमाल 750, सरासरी 525 रुपये प्रतिक्विंटल होते. याआधी उन्हाळला 25 पैसे किलो भाव मिळाला होता. आता लाल कांद्यालाही 25 पैसे किलो भाव पुकारला गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमधील लाल कांद्याचे किमान, कमाल, सरासरी दर क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे- लासलगाव- 300-811-630, येवला- 200-584-500, चांदवड- 200-735-600, कळवण- 250-605-450, दिंडोरी- 300-850-550, निफाड- 200-651-551, नामपूर- 100-660-550.