नांदेडमध्ये ठिकठिकाणी पावसाची बरसात, शेतकऱ्यांना दिलासा

सामना ऑनलाईन । नांदेड

गेल्या बऱ्याच दिवसांपासून गायब झालेल्या वरुणराजाने अखेर आपली आभाळमाया दाखवली असून जिल्ह्यातील शहरांमध्ये शनिवारी संध्याकाळी सुरू झालेली पावसाची संततधार रात्रभर कायम राहिल्याने कोमेजणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

शनिवारी सायंकाळी कुंजलवाडी, नरसीफाटा, अर्धापुर, लोहा कंधार, माहूर या ठिकाणी हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह पिकांना देखील फार मोठा दिलासा मिळाला असून नायगांव, नरसीसह तालुक्यात सर्वत्र रात्रभर कोसळलेल्या पावसाने बळीराजाची चिंता काही प्रमाणात का होईना पण दूर केली आहे. दुसरीकडे कुंडलवाडी परिसरातील तलाव, ओहोळ अद्याप कोरडेच असून मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. तेथील बाभळी बंधारा आणि गोदावरी नदी अजूनही कोरडी आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न अजून देखील टांगणीलाच आहे.

जून महिन्याच्या प्रारंभीच दमदार आगमन करणाऱ्या पावसाने मध्यंतरी थोडासा छिडकावा करून दडी मारल्याने पेरणी करुन बसलेल्या शेतकऱ्यांना पिके वाचवण्याची मोठी चिंता सतावत होती .उगवलेली हिरवीगार पिके पावसाअभावी माना टाकताना बघून रान कोमेजून जाते की काय, या धास्तीने शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत असल्याचे चित्र होते. पण, आता बरसणाऱ्या श्रावणसरींनी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.