नाशकात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले

सामना प्रतिनिधी । नाशिक

त्र्यंबकेश्वर दौऱयावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला मुंबई-आग्रा महामार्गावरील कोणार्कनगर येथे समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखविले. नाशिक मेट्रो शेल्टर २०१७ चे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री नाशिक दौऱयावर आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱयांना ‘दलाल’ संबोधले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी त्यांना काळ झेंडे दाखवले. ओझर विमानतळावरून मोटारीने त्यांचा ताफा त्र्यंबकेश्वरच्या दिशेने नाशिकमार्गे निघाला असता महामार्गावर कोणार्कनगर परिसरात चौफुलीवर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावून निषेध व्यक्त केला.

शेतकरी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत असल्याचे बंदोबस्तावरील पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले व त्यांना आडगाव पोलीस ठाण्यात नेले.

समृद्धीचे काम फेब्रुवारीत सुरू करणार

समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे चित्र बदलणारा आहे. पन्नास टक्के जमिनींचा ताबा मिळाला आहे. येत्या फेब्रुवारीत या महामार्गाचे काम सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.