बदलत्या हवामानामुळे बळीराजा उद्ध्वस्त

सामना प्रतिनिधी । मुंबई

बदलत्या हवामानामुळे बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. शेतातील उभी पिके आडवी होत असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहात आहे. याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘बदलते हवामान : आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री बोलत होते.

चर्चासत्राचे आयोजन विधिमंडळातील वि. स. पागे प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले होते. या चर्चासत्रात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पर्यावरणमंत्री रामदास कदम उपस्थित होते. चर्चासत्राला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, खासदार, पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्य़ा संख्येने उपस्थित होते. फडणवीस पुढे म्हणाले, २०३० पर्यंत काही भागांत मोठ्य़ा प्रमाणात तापमान काढणार असून पावसाचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे हा शास्त्रज्ञांनी दिलेला इशारा आहे. हे टाळण्यासाठी निसर्गसंवर्धनाची आणि समाजात मोठ्य़ा प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिक टाळा – पर्यावरणमंत्री

पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले, प्लॅस्टिकमुळे पर्याकरणाचा मोठ्य़ा प्रमाणात ऱ्हास होत आहे. नदीनाले तुंबून जातात. पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. त्यासाठी प्रत्येकाने प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घातली पाहिजे. कॅरीबॅग नाकारली पाहिजे. हवेतील प्रदूषण वाढते तेव्हा कार्बन-डाय-ऑक्साईड काढलेला असतो. त्याचा परिणाम झाडे आणि मानवी आरोग्यावर होत आहे. म्हणून आता प्लॅस्टिकबंदीचा कायदा आणला आहे. नागरिकांनी आपल्या चांगल्या जीवनासाठी प्लॅस्टिकला नाकारले पाहिजे.