मालवणात कर्जमाफीच्या यादीत बडे व्यावसायिक-उद्योजकांची नावे

सामना प्रतिनिधी । मालवण

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्ज माफी) २०१७ अंतर्गत ऑनलाईन अर्ज केलेल्या मालवण तालुक्यातील शेतकऱ्याच्या यादीचे वाचन शुक्रवारी ठिकठिकाणी करण्यात आले. २४९ शेतकऱ्यांच्या यादीत शहरातील बडे व्यावसायिक, उद्योजक आणि आजी-माजी नगरसेवकांचा समावेश असल्याने या चावडी वाचन कार्यक्रमास उपस्थित असलेले शेतकरी अवाक झाले.

मालवणातील कर्जमाफीच्या यादीची तपासणी आयकर विभागाकडून करण्यात आली आहे. तसेच आवश्यक भासल्यास पुन्हा तपासणी केली जाऊ शकते. शासनाला आवश्यकता असणाऱ्याच शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची आहे. त्यामुळे अद्यापही कार्यवाही सुरू आहे, असे सहाय्यक निबंधक के. आर. धुळप यांनी स्पष्ट केले.

यादीची होणार तपासणी?

मालवण शहरातील यादीत रत्नागिरीतील चार कर्जदार शेतकऱ्याचा समावेश आहे. रत्नागिरीतील शेतकऱ्यानी मालवणातून अर्ज भरले काय? याबाबत खुलासा करताना सहाय्यक निबंधकांनी आधारकार्डमुळे सदरची नावे मालवणच्या यादीत समाविष्ट झाल्याची शक्यता असेल, असे स्पष्ट केले. मात्र शासनाकडून पुन्हा यादीची तपासणी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.