शेतकरी, कष्टकरी, निराधाराचा १८ फेब्रुवारी रोजी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

9


सामना प्रतिनिधी । अहमदपूर

साडेचार वर्षांपासून मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर, निराधार व सर्वच वंचित घटकांसोबत होणाऱ्या सापत्न वागणुकीमुळे त्यांची सुरू असलेली हेळसांड रोखून त्यांच्या न्याय्य मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आमदार अमीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १८ रोजी उपविभागीय कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. गणेश कदम यांनी सांगितले.

१८ रोजी सकाळी १०.३० वाजता थोडगा रोडवरील निजवंतेनगर येथून या मोर्चास सुरुवात झाल्यानंतर हा मोर्चा शहरातील सर्व प्रमुख मार्गांवरून उपविभागीय कार्यालयात पोहचेल. त्यानंतर या मोर्चाचे तेथेच जाहीर सभेत रुपांतर होणार असून आमदार देशमुख हे मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

स्थानिक नेतृत्वाचा वचक न राहिल्याने प्रशासन मुजोर बनले आहे. वरिष्ठ पातळीवरून मतदारसंघाला सापत्न वागणूक देण्यात येत असल्यामुळे येथील शेतकरी, कष्टकरी, निराधार, वंचितांची हेळसांड सुरू झाली आहे. मतदारसंघातील सामान्य जनतेला कोणीही वाली उरला नसल्यामुळेच आमदार अमीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान द्यावे, वीजबील व शेतीकर्ज पूर्णपणे माफ करावे, पीकविमा वाटपातील भेदनीती थांबवावी, मजूरांच्या हाताला काम आणि जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात, विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करून त्यांना एसटीचे मोफत पास द्यावेत, ऑनलाईन नोंदणी करूनही माफ न झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान द्यावे. सिध्दी शुगरने मतदार संघातील ऊस उचलण्यास प्राधान्य देऊन एफआरपी प्रमाणे ऊस दर द्यावा, निराधारांचे अनुदान प्रतिमाह १५०० रुपये करावे, शासनाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्यावी या व अशा इतर अनेक महत्वाच्या मागण्यांसाठी आयोजित या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

यावेळी त्यांच्यासमवेत पक्षाचे सरचिटणीस सतीशराव क्षीरसागर, सेवादलाचे तालुकाध्यक्ष हेमंत माकने, सिराजुद्दीन जहागीरदार, युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, उत्तमराव माने, शिक्षक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष युवराज पाटील, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद एझाज, बापूराव शिंदे, बापू गोखरे, दयानंद वाघमारे, दिलीपराव कदम यांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या