शिरसाठवाडी पाझर तलावातून अनधिकृत पाण्याचा उपसा; ग्रामस्थांचा डफडे मोर्चा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील पाझर तलावातून अनधिकृतरित्या पाणी उपसा करण्याच्या प्रकरणाला जबाबदार धरून ग्रामसेवक व पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज तेथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर डफडे मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व राजेंद्र शिरसाठ यांनी केले. संबधीत व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्रभारी तहसीलदार पंकज नेवसे यांनी दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शिरसाठवाडी येथील तलावातून गेल्या अनेक दिवसांपासून तलावा लगत असलेल्या शेतकऱ्यांनी अनधिकृत वीजपंप टाकून पाण्याचा उपसा केला असल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी करत हा उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर तसेच ग्रामसेवकावर कारवाई करावी अशी मागणी महसूल प्रशासनाकडे केली होती. कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या नुसार आज शिरसाठवाडी येथील राजेंद्र शिरसाठ, पोपट पालवे, आजिनाथ शिरसाठ, शिवाजी महाजन, नारायण शेकडे, दीपक शिरसाठ, सुनील शिरसाठ, आसाराम शिरसाठ आदी कार्यकर्त्यांनी डफडे वाजवत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

या वेळी बोलताना राजेंद्र शिरसाठ म्हणाले कि, तलावालगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी तलावात वीजपंप टाकून तसेच तलावाच्या शेजारी विहीर खोदून अमर्याद पाणी उपसा केल्याने तलावातील पाणी साठा संपून गेला आहे. सध्या शिरसाठवाडीला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाला या प्रकरणाची वेळीच माहिती दिली होती मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या ठिकाणी असलेल्या ग्रामसेवकाला राजकीय आशीर्वाद असल्याने तो कोणतीही कारवाई करत नाही. या ग्रामसेवकाची बदली होऊन सहा महिने झाले असले तरीही ती पदभार सोडत नाही. तलावाची मोजणी फी भरलेली आहे मात्र मोजणी केली जात नाही. तातडीने कारवाई करावी अन्यथा मोर्चा विसर्जित करणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यानंतर प्रभारी तहसीलदार पंकज नेवसे यांनी पंधरा दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.