राज्य सरकारचा शेतकऱ्यांना शॉक, सात दिवसांत वीज बिल न भरल्यास कनेक्शन कट

सामना प्रतिनिधी । नागपूर

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱया शेतकऱयांना राज्य सरकारने आज जबर शॉक दिला आहे. शेतकऱयांसाठी वीज बिल वसुलीची नवी योजना घेऊन आल्याची घोषणा करतानाच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या सात दिवसांत चालू वीज बिल न भरणाऱया शेतकऱयांचे कनेक्शनच कापण्यात येईल, असे बजावले आहे.

बावनकुळे आज पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱयांकडे वीज बिलाची थकबाकी 19 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. शेतकऱयांनी 10 हजार कोटी रुपये मूळ थकबाकी भरावी यासाठी पाच टप्पे पाडण्यात आल्याचे ते म्हणाले. 41 लाख शेतकऱयांना व्याज आणि दंडातून सवलत देणार आहे.

गेल्या तीन वर्षांत आम्ही एकाही शेतकऱयाचे वीज कनेक्शन कापले नाही. पण आता वीज खरेदीसाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत. म्हणूनच थकबाकी वसुलीसाठी हा उपाय करावा लागतोय.
– चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री

पाच टप्प्यांत वसुली

30 हजारांवर थकबाकी असेल त्यांनी दीड महिन्याच्या 10 टप्प्यांमध्ये वीज बिल भरावे.

डिसेंबर 2017 पहिला टप्पा, मार्च 2018 दुसरा, जून तिसरा, सप्टेंबरमध्ये चौथा आणि डिसेंबर 2018 मध्ये पाचवा टप्पा असेल.

या नव्या योजनेचा लाभ मिळेलच पण तत्पूर्वी सात दिवसांत चालू वीज बिल पूर्ण भरावे लागेल.

थकबाकीची आकडेमोड

थकबाकीची रक्कम 19 हजार 272 कोटी

मूळ रक्कम 10 हजार 890, तर व्याज 8 हजार 164 कोटी

दंडाची रक्कम 218 कोटी

2012 पासूनची ही थकबाकी आहे.