मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांची घोषणाबाजी

सामना प्रतिनिधी । नागपूर

वर्धामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्याच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. सेवाग्राम विकास आराखड्याचे भूमिपूजन करण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर काळे कपडे घालून आलेल्या २५ ते ३० जणांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू ठेवल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचे कापसाचे चुकारे (पैसे) न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यासमोर घोषणाबाजी केली. सुनील टालाटुले या व्यक्तीने मागील वर्षी शेतकऱ्याकडून २१ कोटी रुपयांचा कापूस खरेदी केला होता, मात्र पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मुंबईत झालेल्या चर्चेनंतर सरकारने पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खिशात एक पैसाही पडला नसल्याने शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यासमोर ‘शेतकऱ्यांचे कापसाचे चुकारे (पैसे) द्या’, ‘सुनील टालाटुले मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी केली.