आश्वासन पत्रांची शेतकऱ्यांनी केली होळी

सामना प्रतिनिधील। संभाजीनगर

मागण्या पूर्ण करणार असल्याचे आश्वासन देऊनही त्याकडे दुर्लक्षच केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज बीड बायपास रोडवर रस्त्यावर दूध सांडून देऊन आणि सरकारने मागण्या मान्य केल्याच्या घोषणापत्राची होळी करून शासनाचा निषेध केला. यानंतरही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने पाहणार नसेल, तर १ मेनंतर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा किसान क्रांतीच्या राज्यस्तरीय बैठकीत देण्यात आला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकरी पुत्रांनी एकत्र येत जून २०१७ मध्ये पेरणी करणार नाही, असा निर्धार करून संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे सरकारला धडकीच भरली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकत्र्यांना चर्चेसाठी बोलावून मागण्या मान्य करीत असल्याचे आश्वासन दिले. तसे घोषणापत्रही तयार करण्यात आले. परंतु त्यानंतर पाच महिने उलटून गेले. परंतु, फडणवीस सरकारने दिलेले आश्वासन तर पाळले नाही, उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकNयांत तीव्र नाराजी पसरली. सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे पुन्हा आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठी आज बीड बायपास रोडवरील पटेल लॉन्सवर किसान क्रांतीची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर उत्स्फुर्तपणे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेत मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना लागू करावी, आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे यासह अन्य मागण्या मान्य करीत असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी शिष्टमंडळास दिलेले असले तरी त्याचे पालन सरकारने केलेले नाही. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीस संभाजीनगर जिल्ह्यासह अहमदनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील किसान क्रांतीचे समन्वयक मोठया संख्येने हजर होते.

यावेळी किसान मोर्चाच्या वतीने वीज बिलांची तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर करीत असल्याचे जे घोषणापत्र तयार केले होते त्याचीही होळी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत सरकारविरोधातील लढा चालूच ठेवणार असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्यासंदभात मुख्यमंत्री भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्याचे स्मरण करून देण्यात येणार असून त्यानंतरही सरकारने दखल नाही घेतली तर १ मे २०१८ पासून आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यास शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला शहरात आणला जाणार नाही, दूध शहरात पाठविले जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी किसान मोर्चाचे जिल्हा समन्वयक जयाजी सूर्यवंशी, विजय काकडे पाटील, नाशिकचे शंकरराव दरेकर, नगरचे सतीश कानवडे पाटील, जळगावचे हनुमंत बेळगे, पुणेचे समन्वयक नितीन थोरात, बाळासाहेब जाधव, महेश गुजर, विष्णूअण्णा बोडके, बाबुराव केतके, उस्मान हबीब बेग, उस्मान बेग, श्रीमंत नाना जगदाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

…तर शेतकरी क्रांतिकारक बनतील : जगदाळे
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण तो आज दुर्लक्षित झालेला आहे. शेती मालाला हमी भाव दिला पाहिजे, शेतकऱ्यांना शासनाने पेन्शन योजना लागू केली पाहिजे, सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, परंतु सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहाताना दिसत नाही. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकNयांची सहनशक्ती संपली आणि तो पेटून उठला तर यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, तो क्रांतिकारक बनेल. मरणार नाही, अन्याय करणाऱ्यांना मारेल, असा इशारा नगर जिल्ह्यातील विजयपूरचे शेतकरी श्रीमंत नाना जगदाळे यांनी दिला.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करा : पालवे
निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारही गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे सरकारने सर्व कर्ज माफ केले पाहिजे अशी मागणी केकतजळगाव (ता. पैठण) येथील मयत शेतकऱ्याची पत्नी चंद्रभागा कारभारी पालवे यांनी केली आहे. त्यांच्या पतीने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. एवढेच नव्हे तर याच कारणासाठी त्यानंतरच्या काळात मुलानेही आत्महत्या केली असल्याने पालवे कुटुंब उघड्यावर आले आहे.