बळीराजा संपावर गेला, महाराष्ट्राला घाम फुटला!

नांदेड ते मालेगाव आणि लिंबगावर रस्त्यावर शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकला

सामना ऑनलाईन, नगर/नाशिक/सोलापूर/संभाजीनगर

कोटय़वधी जनतेचा पोशिंदा असलेला ‘बळीराजा’ आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संपावर गेला आणि २४ तासांच्या आत अवघ्या महाराष्ट्राला अक्षरशः घाम फुटला. शेतकऱ्यांच्या या संपाला आक्रमक वळण लागले. साताऱ्यात मध्यरात्री ‘गोकुळ’चे दोन दुधाचे टँकर्स रोखून दगडफेक झाली आणि दिवस उजाडेपर्यंत हे लोण राज्यभर पसरले. नगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगरसह अनेक ठिकाणी टँकर्स अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले. शहरांकडे जाणारा भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकून दिली. शेतकऱ्यांचा हा आक्रोश सुरू असताना प्रशासन आणि पोलिसांकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक ठिकाणी आंदोलक शेतकऱयांची धरपकड सुरू असून लाठीमार करण्यात येत आहे. येवला येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात उंदीरवाडी येथील रहिवासी ३५वर्षीय शेतकरी बापूसाहेब यशवंतराव जाधव यांच्या पायाला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तर शेतकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत ५ पोलीस जखमी झाले. दरम्यान, शहरांकडे जाणारी ‘रसद’ तोडण्यात आल्यामुळे उद्या शुक्रवारपासून या संपाची खरी तीक्रता जाणवेल. इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी संपावर गेल्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे.

शेतकरी संपाची भूमिका नगर जिल्हय़ातील पुणतांबा येथे पहिल्यांदा मांडण्यात आली होती. आजपासून सुरू झालेल्या या संपाला नगर जिल्हय़ात सर्वत्र १०० टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी हा संप मोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. २५० वर शेतकऱयांवर गुन्हे दाखल केले पण शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. जिल्हय़ातील सर्व बाजार समित्या, आठवडा बाजार बंद झाला. मुंबईला जाणारे १५ हजार लिटर दूध अडविण्यात आले. हजारो लिटर दूध, भाजीपाला रस्त्यावर टाकला. नगर तालुक्यासह श्रीगोंदा, पारनेर, निघोज, पाथर्डी, राहुरी, कोपरगाव, राहाता आदी ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले.

ब्राह्मणीतील शेतकऱयांचे स्मशानात उपोषण

शेतकऱयांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी ब्राह्मणीतील युवा शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत शेतकऱयांच्या हिताचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत अन्नपाण्याचा त्याग करण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी गाव बंद पाळून सरकारचा निषेध केला.

नगरपुणे महामार्ग ठप्प

नगर-पुणे महामार्गावर बेलवंडी फाटा येथे शेतकऱ्यांनी केलेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास विस्कळीत झाली होती. आंदोलनादरम्यान शेतमाल वाहून नेणारी वाहने अडवून आंदोलकांनी शेतमाल रस्त्यावर ओतला. नगर-पुणे महामार्गावर  संतप्त आंदोलकांनी टेम्पो अडवून आंबे रस्त्यावर ओतून दिले. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी कांदा, बटाटा, टरबूज, दुधी भोपळा, टोमॅटो आदी शेतमालासह दूध रस्त्यावर ओतून घोषणाबाजी केली.

ऊर्जा कंपनीच्या गाडीचालकास चोप

शेतकऱयांचा संप कर्जत तालुक्यात चिघळला आहे. दिल्ली व मुंबई येथे जाणारे  दुधाचे  तीन टँकर अडवून त्यातील  दीड कोटी रुपयांचे दूध शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतून दिले तर ऊर्जा कंपनीची गाडी अडवली असता ड्रायव्हरने ती थांबवली नाही म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी पाठलाग करीत चालकाला चोप दिला.

पुणे जिल्हय़ात उत्स्फूर्त प्रतिसाद

जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्टय़ातील शेतकऱयांनी सकाळी पुणे -नाशिक आणि कल्याण -नगर महामार्ग अडवला. भाजीपाला आणि कांद्याची वाहतूक करणाऱया गाडय़ा अडवून त्यातील भाज्या आणि कांदा रस्त्यावर फेकून दिला. दुधाची वाहतूक करणारे टँकर अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतून दिले. या आंदोलनामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती त्तर काही शेतकऱ्यांनी आळेफाटा चौकात पोलिसाना आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

कोल्हापूर, कराडकडे जाणारा भाजीपाला रोखला

शेतकरी संपाची झळ औंधसह परिसरातील गावांमध्येही दिसू लागली असून अनेक ठिकाणी दूध डेअरी बंद असल्यामुळे शेतकऱयांकडेच पडून राहिले. औंध परिसरातील गोपूज येथे भाजीपाल्याच्या गाडय़ा अडवून कोल्हापूर, कराडकडे जाणारा भाजीपाला रोखून धरण्यात आला. दरम्यान, भुईंज येथील आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला.

शेतकरी संपामुळे नांदेड शहराला होणारा दूध व भाज्यांचा पुरवठा एकदम घटला. शहरातील गांधी पुतळा, राज कॉर्नर येथे दूध व भाजीपाला रस्त्यावर टाकून शेतकऱयांनी सरकारचा निषेध केला. मालेगाव रस्त्यावरही शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. अर्धापूर तालुक्यात वसमत फाट्यावर शेतकऱयांनी दूध ओतून दिले.  हिंगोली जिल्ह्यात बासंबा येथील शेतकऱ्यांनी दूध, भाजीपाला बाजारात पाठवला नाही. एका शेतकऱयाने  विक्रीसाठी आणलेला ५० किलो गहू रस्त्यावर टाकला. शेतकऱयांच्या संपामुळे बीड जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये स्मशान शांतता पसरली होती. पाटोदा, वडवणी, गेवराई येथे संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथे शेतकऱयांनी संपात सहभागी होत दूध विक्रीला न नेता गावातच घराघरांत जाऊन लहान मुलांना वाटप केले. परभणी, धाराशिव, जालना येथेही ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. संभाजीनगर जिल्हय़ातही शेतकऱयांनी रस्त्यावर दूध ओतून दिले. भाज्या टाकून दिल्या.

अकलूजमध्ये दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकला

माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असून तालुक्याच्या विविध ठिकाणी दुधासह भाजीपालाही रस्त्यावर फेकून देण्यात आला. अकलूज मंडईमध्ये भाजी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाबाचे फूल देत गांधीगिरी केली. यावेळी उद्या भाजी न आणण्याचे आवाहन करण्यात आले. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज ७० टक्के भाजीपाल्याची आवक घटली. विझोरी येथील शिवामृत दूध संघाचे दैनंदिन संकलन ८० हजार लिटर आहे.

नगर-मनमाड हायवेला दूध-फळांचा अभिषेक

कोपरगाव तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला. कोपरगाव येथे नगर-मनमाड हायवेवर उमटले. सकाळी दूध उत्पादकांनी आपले हजारो लिटर दूध ओतून हायवेला अभिषेक घातला. त्यानंतर हायवेवरून जाणारे मालट्रक अडवून आंबा, लिंबू, डाळिंब, डाळी, कांद्याचे ढीग, नारळाच्या गोण्या, खोबरे, डाळिंबाचे बॉक्स, लसूण, तेलाचे डबे, खोबरे, तेलाच्या बाटल्या, मसाले, तांदूळ, आंब्याचे ढिगारे, साखर, बेसनपीठ, मैद्याच्या पिठासह मसाल्याचे पदार्थ हायवेवर ओतले. हायवेवर ओतलेल्या फळांमुळे रस्त्यावर दूध-फळांचा चिखल झाला. करोडोंचा शेतमाल मातीमोल झाला. संतप्त शेतकऱयांपुढे पोलीस हतबल झाले तर शेतकरी संपामुळे लुटारूंची मात्र चंगळ झाली. पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. संतप्त शेतकऱ्यांना पोलिसांनी रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावापुढे पोलीस हतबल झाले होते. अखेर पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

तीस कोटींची उलाढाल ठप्प

आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठा अशी ओळख असलेल्या लासलगाव व पिंपळगाव बाजार समित्यांसह जिह्यातील सर्वच ठिकाणी आज कांदा, धान्य, फळे, भाजीपाला यांचे लिलाव बंद होते. यामुळे एकाच दिवसात तब्बल तीस कोटींची उलाढाल ठप्प झाली. शेतकऱयांनी शेतीमाल विक्रीस आणावा, त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल, या प्रशासनाच्या आवाहनाला भीक न घालता शेतकरी संपात उतरले. यामुळे सर्व बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट होता. दूध, भाजीपाला, धान्य यासह कुठल्याही शेतमालाचा पुरवठा मुंबईसह राज्यभर कुठेही झाला नाही.

पोलीस प्रशासनाचा डाव उधळला

नाशिक जिह्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले. प्रशासन पोलीस बंदोबस्तात माल वाहतुकीला प्रोत्साहन देत असल्याचे समजताच त्यांनी मालवाहतुकीच्या गाडय़ा रोखल्या. निफाड तालुक्यातील नैताळे, मनमाडची नांदगाव चौफुली, मालेगाव तालुक्यातील निमगाव, अजंग, दिंडोरी तालुक्यातील पालखेड चौफुली, उमराळे, देवळ्यातील पाचकंदील या ठिकाणी त्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. संप मोडीत काढण्याचा पोलीस प्रशासनाचा डाव उधळला.

कल्याणच्या बाजार समितीत खरेदी जोरात

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज नेहमीप्रमाणे शेतमालाची आवक झाली. गुजरात, कर्नाटक, तामीळनाडू येथून अन्नधान्य, शहापूर, मुरबाड, नगर, नाशिक येथून भाजीपाला, फळे, फुले, कांदा-बटाटा याची सरासरी १५० ट्रक, टेम्पोतून आवक होते. आज ४२ ट्रक ७९ टेम्पोंमधून भाजीपाला आला तोही सकाळी १० वाजेपर्यंत संपला.

वाहतूकदारांचा शेतमाल आणण्यास नकार

परंतु ठिकठिकाणी तोडफोड सुरू झाल्याने ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी वाहनचालकांना रस्त्यावर गाडय़ा न आणण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. सरकारने वाहनचालकांना पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे जाहीर केले आहे, पण आमच्या गाडय़ा फुटल्या तर सरकार जबाबदारी घेणार काय, असे ठणकावत वाहतूकदारांनी शेतमाल घेऊन येण्यास स्पष्ट नकार दिल्याने परिस्थिती आणखीच गंभीर होणार आहे.

कोपरगावात संपाचा पहिला बळी; शेतकऱयाचा हृदयविकाराने मृत्यू

कोपरगाव येथे नगर-मनमाड महामार्गावरील टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी दुपारी ३.३०च्या सुमारास नाटेगाव येथील शेतकरी अशोक शंकर मोरे यांचा हृदयविकाराच्या तीक्र झटक्याने मृत्यू झाला.

संपाच्या आडून हिंसा घडवण्याचा काँग्रेसराष्ट्रवादीचा डाव

शेतकरी संपाच्या नावाखाली राज्यातील शेतकऱयांना वेठीस धरले जात असून संपाच्या आडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा राज्यात हिंसा घडवण्याचा डाव असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. संपामुळे शेतकऱयांचेच नुकसान होत आहे. शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत पण सरसकट कर्जमाफी देणे कोणत्याही सरकारला शक्य नाही असे मुख्यमंत्र्यांनी खास पत्रकार परिषदेत सांगितले.