केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; जंतर-मंतरवर धडकले पाच हजारांहून अधिक आंदोलक

दोन वर्षांपूर्वी कृषी कायद्यांवरून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलनाचे शस्त्र उपसणाऱया शेतकऱयांनी सोमवारी पुन्हा एल्गार पुकारला. संयुक्त किसान मोर्चाने जंतर-मंतरवर आयोजित केलेल्या महापंचायतीला विविध राज्यांतून तब्बल 5 हजारांहून अधिक शेतकऱयांनी हजेरी लावली. यावेळी पोलिसांनी शेतकऱयांना दिल्लीच्या सीमांवर रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतप्त झालेल्या आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडले. यादरम्यान नोएडा-चिल्ला बॉर्डरवर तब्बल 5 किलोमीटर लांब ट्रफिकचा खोळंबा झाला होता.

शेतपिकांचा किमान हमी भाव (एमएसपी) व इतर मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांना आश्वासने दिली होती; पण दोन वर्षांनंतरही सरकारने ती आश्वासने पूर्ण न केल्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. पंतप्रधानांना आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱयांनी सोमवारी जंतरमंतरवर धरणे आंदोलन पुकारले होते.शेतकरी आंदोलकांना दिल्लीच्या सीमेवरच अडवले जात होते. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले व काहींनी रस्त्यावर लावण्यात आलेले बॅरिकेड्स पाडले. याप्रकरणी गाजीपूरच्या सीमेवर 19 शेतकऱयांना ताब्यात घेण्यात आले. हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेशचे शेतकरी महापंचायतीत सहभागी होण्यासाठी सोमवारी सकाळपासून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. पोलिसांकडून दडपशाहीचा वापर होऊ लागताच अनेक संतप्त शेतकरी बहादूरगढ रेल्वे स्थानकात पंजाबहून दिल्लीला जाणाऱया ट्रेनवर चढले. त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.