रामजी व रत्नमालाचे शाप, सरकारच्या मृत्यूची आकस्मिक नोंद!

2

कधीकाळी सध्याचे मुख्यमंत्री आक्रमक भाषेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करीत होते. विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री होतो तेव्हा रंग बदलतो, या टीकेतून आणि समजातून फडणवीस यांनी स्वतःला बाहेर काढले पाहिजे. जालन्यातील रामजी रत्नमाला यांनी अखेर मृत्यूला कवटाळले. असे अनेक रामजी रत्नमाला आपल्या मुलांना निराधार करून रोज मरण जवळ करीत आहेत. सरकार अशा प्रकरणांची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून पुन्हा दूरदर्शनवर गप्पा मारण्यासाठी पोहोचते. हे असेच आणखी काही काळ सुरू राहिले तर एक दिवस सरकारच्या मृत्यूचीही आकस्मिक अशी नोंद करावी लागेल. लाखो शेतकऱ्यांचे शाप उत्पात घडविल्याशिवाय राहणार नाहीत.

पंतप्रधान मोदी हे ‘मन की बात’मधून देशातील जनतेशी संवाद साधीत असतात. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या दूरदर्शन कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या रविवारी त्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. शेतीसाठी अखंड १२ तास वीजपुरवठा करू असे नवे धोरण त्यांनी जाहीर केले आहे. बाकी ठिबक सिंचन, जलसिंचन, कृषीबरोबरच ग्रामविकासाला प्राधान्य, फळप्रक्रिया उद्योगास चालना असे अनेक उपक्रम त्यांनी नव्या कार्यक्रमात जाहीर केले आहेत. या सर्व योजनांचा धुरळा गेल्या पाच-पंचवीस वर्षांत हजारदा उडाला आहे व तो उडत असताना तेव्हा विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस हे शेतकऱयांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी करीत होते. याचा त्यांना आता विसर पडला आहे. शिवसेना आणि भाजप या दोघांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी विरोधी पक्षात असताना आक्रमक पद्धतीने केली होती. शिवसेना आजही त्या मागणीवर ठाम आणि आग्रही आहे. तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीच, असे तेव्हा सांगणाऱ्या फडणवीस यांनी या मागणीची आता पूर्तता करायची आहे. मुख्यमंत्री स्वतःला तरी गांभीर्याने घेत असतील तर ‘मी तोच देवेंद्र फडणवीस आहे व शब्दाला जागणारा आहे’ असे त्यांनी दाखवून द्यायला नको? मुख्यमंत्री आता म्हणतात, कर्जमाफी शक्य नाही. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरेच थांबतील काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. काँग्रेसचे सरकार घालवा. आम्हाला सत्ता द्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवतो, असा

शब्द देणारे कोण होते

हो? मुख्यमंत्री ‘सह्याद्री’ वाहिनीवर ‘मन की बात’ बोलत असताना जालना जिल्ह्यातील घनसावंगीत रामजी व रत्नमाला रणमळे या शेतकरी दांपत्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कोडलकर दांपत्यानेही कर्जास कंटाळून आत्महत्या केली. अंबड तालुक्यातील शेतकऱ्यानेही याच दरम्यान मृत्यूला कवटाळले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातही सोमवारी कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून राकेश शेवाळे आणि मनोज शांताराम सावंत या पंचविशीतील तरुण शेतकऱ्यांनी स्वतःचे जीवन संपविले. रोज किमान पाच ते दहा शेतकरी आत्महत्या करतात. महिनाकाठी हा आकडा शंभरावर जातोय. नवीन सरकारच्या काळात ३ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात हे चित्र महाराष्ट्राबरोबरच आपल्या मोदी सरकारलाही भूषणावह नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रांचे ‘रोड शो’ केले तर जगात आमच्या राज्यकर्त्यांची ‘छी थू’ होईल. शेतकऱयांचे जीवन सध्या निसर्गाच्या अवकृपेने, कर्जाने व नोटाबंदीमुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेने उद्ध्वस्त झाले आहे. सरकारच्या घोषणांच्या पावसाने व जाहिरातबाजीने त्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. जालन्यातील ज्या शेतकरी दांपत्याने आत्महत्या केली त्यामागचे कारण तरी समजून घ्या. रामजीच्या नावावर सहा एकर तर त्यांच्या पत्नीच्या नावावर तीन एकर शेतजमीन आहे. शेतीसाठी त्यांनी बँकेकडून साडेतीन लाखांचे कर्ज घेतले होते; परंतु त्याची परतफेड करणे शक्य नव्हते. शेतीसाठी पाइपलाइन, ठिबक सिंचन संचासाठी त्यांना

आणखी कर्जाची आवश्यकता

होती, परंतु आधी घेतलेल्या कर्जाची थकबाकी असल्याने बँकेकडून पुन्हा कर्ज मिळण्याची शक्यता नव्हती हे साधे गणित आहे. मग मुख्यमंत्र्यांनी ज्या ठिबक सिंचन, अखंड वीज वगैरे घोषणा केल्या त्या काय शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रांची रोषणाई करण्यासाठी? वास्तविक आज गरज आहे ती कर्जबाजारी शेतकऱयांचा सातबारा कोरा करण्याची. तो करताय का ते सांगा. विरोधी पक्षाचे पुढारी सांगतात, कर्जमाफीशिवाय मंत्र्यांना मतदारसंघात फिरू देणार नाही. अजित पवार यांनी सांगितले आहे की, ‘‘सत्ता सोडा, आम्ही कर्जमाफी करून दाखवतो!’’ अजित पवारांचे हे विधान ऐकून करमणूक होत असली तरी कधीकाळी सध्याचे मुख्यमंत्री याच आक्रमक भाषेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करीत होते. विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री होतो तेव्हा रंग बदलतो, या टीकेतून आणि समजातून फडणवीस यांनी स्वतःला बाहेर काढले पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे सरकारला चिंता वाटत असेल तर दूरदर्शनवरील गप्पाष्टकांच्या बाहेर पडून गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहायला हवे. जालन्यातील रामजी व रत्नमाला यांनी अखेर मृत्यूला कवटाळले. असे अनेक रामजी व रत्नमाला आपल्या मुलांना निराधार करून रोज मरण जवळ करीत आहेत. सरकार अशा प्रकरणांची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून पुन्हा दूरदर्शनवर गप्पा मारण्यासाठी पोहोचते. हे असेच आणखी काही काळ सुरू राहिले तर एक दिवस सरकारच्या मृत्यूचीही आकस्मिक अशी नोंद करावी लागेल. लाखो शेतकऱयांचे शाप उत्पात घडविल्याशिवाय राहणार नाहीत.