नाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सामना प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील चौसाळे येथे ७०वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन, तर सटाणा तालुक्यात जायखेडा येथील ५४ वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. जिल्ह्यात चालू वर्षी ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

दिंडोरी तालुक्यातील चौसाळे शिवारात राहणाऱ्या आनंदा नारायण केदारे (७०) यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील मधुकर पुंडलिक पवार (५४) यांनी कर्जाला कंटाळून बुधवारी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यांची निताणे शिवारात पाच ते सहा एकर कोरडवाहू जमीन आहे. नापिकी व कर्जाचा वाढता डोंगर याला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांच्यावर जायखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे व हातउसने कर्ज होते. बुधवारी सकाळीच ते घरातून निघून गेले होते. कुटुंबीयांनी शोध घेतला असता जायखेडा-निताणे रस्त्यावरील रघुनाथ विठ्ठल देवरे यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांच्या चपला व कपडे आढळले.