विहिरीत उडी मारून शेतकऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । सटाणा

बागलाण तालुक्यातील उत्राणे गावातील तरुण शेतकरी प्रवीण पगार (३०) गेल्या अनेक महिन्यांपासून शेतातील नापिकीमुळे त्रस्त झाला होता. त्यात सेंट्रल बँक ऑफ इंडिया, म्हसदी शाखेने उद्योग व्यवसायासाठी मराठा समाजाचा युवक असल्यामुळे कर्ज नाकारल्याच्या भावनेतून त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विशेष म्हणजे प्रवीण अविवाहित असून दिव्यांग होता.

बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील मूळचा रहिवासी असलेला व सध्या साक्री तालुक्यातील म्हसदी येथे शेती घेऊन वास्तव्यास असलेला प्रवीण पगार गेल्या अनेक महिन्यांपासून शेतातील नापिकीमुळे त्रस्त होता. यामुळे काहीतरी उद्योग व्यवसाय करून आईला मदत करावी या भावनेतून म्हसदी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेकडे कर्जाची मागणी करत होता. आपण दिव्यांग असून आपणास कर्ज मिळावे यासाठी त्याने बँकेकडे अनेक वेळा पाठपुरावाही केला होता. मात्र बँकेने त्याला कर्ज देण्यास नाकारले. आपण मराठा समाजाचे असल्याकारणाने बँकेने कर्ज देण्यास विरोध केला असल्याची खंत प्रवीणने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून व्यक्त केली आहे.

ही बाब प्रवीणने निवेदनाद्वारे सहकार मंत्री सुभाष देशमुख, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, धुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली; मात्र वरिष्ठांनीही दुर्लक्ष केल्याने आज सायंकाळी प्रवीणने उत्राणे येथील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

जायखेडा पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्यासह नागरिकांनी विहिरीतून प्रवीणचे शव काढून सांयकाळी नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. प्रवीण याच्या आईच्या नावावर शेती असून ती अल्पभूधारक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आपण त्रस्त असल्याचेदेखील प्रवीणने चिठ्ठीत नमूद करून आत्महत्या केली आहे.