धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन शेतकऱ्याने केली आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नागपूर

सततची नापिकी, वाढते कर्जबाजारीपण आणि कर्ज परतफेडीची चिंता याला कंटाळून शेतकऱ्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना नरखेड तालुक्यातील नरखेड -अमरावती रेल्वेमार्गावरील मोवाड रेल्वे फाटकाजवळ गुरुवारी रात्री घडली. मृत शेतकरी हा माणिकवाडा (ता. नरखेड) येथील रहिवासी आहे.

सुरेश नारायणराव डवरे (६७, रा. माणिकवाडा, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सुरेश डवरे यांच्याकडे ३.२१ हेक्टर आर शेती असून, त्यातील काही ओलिताची तर काही कोरडवाहू शेती आहे. त्यांनी अलाहाबाद बँकेच्या नरखेड शाखेकडून तीन वर्षांपूर्वी तीन लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते.

suresh-daware-farmer_201712

नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य न झाल्याने ते कर्ज थकीत राहिले. यावर्षी राज्य शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. सुरेश डवरे यांनीही कर्जमाफीचा अर्ज भरला होता. शिवाय, सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. परंतु, त्यांचे कर्ज अद्यापही माफ झाले नव्हते. त्यातच यावर्षी त्यांना थोडेफार बरे पीक होऊनही अल्प बाजारभाव मिळाला. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून चिंताग्रस्त असल्याची माहिती त्यांच्या पत्नी शोभा डवरे यांनी दिली.

त्यातच ते गुरुवारी दुपारी शेतात गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने घरच्या मंडळींनी शोध घेतला असता, नरखेड-अमरावती रेल्वेमार्गावरील मोवाड रेल्वे फाटकाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पत्नी शोभा डवरे यांच्यासह कुटुंबीयांनी दिली. दुसरीकडे, राज्य शासनाने मृत सुरेश डवरे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच त्यांच्याकडील कर्ज माफ करावे, अशी मागणी माणिकवाड्याच्या सरपंच सुनीता डवरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.