वसंतदादा पाटील साखर कारखान्याला पुरवलेल्या उसाचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी नाराज

सामना प्रतिनिधी, सटाणा

डी. व्ही. पी. ग्रुप संचलित धाराशिव कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला 2018-19 च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादकांनी पुरवठा केला. मात्र बहुसंख्य ऊस उत्पादकांचे पेमेंट अद्यापही खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

ऐन दुष्काळी परिस्थितीत सुमारे 12 ते 14 महिने जतन केलेला ऊस शेतकऱयांनी वसाकाला पुरवला. दरम्यान, धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील व संचालक मंडळाने कारखान्याच्या बॉयलर व गव्हाण पूजनाच्या दिवशी शेतकऱयांना आश्वस्त केले होते. नाशिक जिह्यातील अन्य कारखाने जो भाव देतील त्यापेक्षा किमान एक रुपया तरी जास्त भाव देण्यात येईल. तसेच ऊस आल्याबरोबर काटय़ावर धनादेशाने पेमेंट अदा केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.

सुरुवातीला 15 दिवस काट्यावर रोख 2 हजार रुपये प्रतिटनप्रमाणे बिल अदा केले गेले असले तरी शेजारील द्वारकाधीश कारखान्याने मात्र 2,370 रुपये प्रतिटनाप्रमाणे ऊस बिल अदा केले. त्यामुळे वसाकाला ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांनी वरील 371 रुपयांची मागणी केली असता बँक उचल देत नसल्याचे कारण पुढे करत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

जानेवारीनंतर पुरवठा केलेल्या उसाचे पेंमेट अद्यापही शेतकऱयांच्या खात्यावर वर्ग झाले नसून कारखान्याने अदा केलेले ऊस बिलांचे धनादेश वटत नसल्याची तक्रार साक्री तालुक्यातील मलाजे येथील ऊस उत्पादक शेतकरी राजेंद्र सोनवणे यांनी केली आहे. दरम्यान, वसाका कामगारांच्या काम बंद आंदोलनासदेखील सुमारे 15 दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कायदेशीर कार्यवाही करणार
काही शेतकऱ्यांचे धनादेश वटत नसल्यामुळे कारखाना प्रशासनाविरोधात असंतोष निर्माण झाला असून वसाकास पुरवठा केलेल्या उसाचे बिल अदा न केल्यास व धनादेश न वटल्यास कायदेशीर कार्यवाहीचा इशारा ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, राजेंद्र सोनवणे, लक्ष्मण निकम, राजेंद्र जाधव, त्र्यंबक पवार आदी ऊस उत्पादकांनी दिला आहे.