कापसाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत

सामना प्रतिनिधी । बदनापूर

बदनापूर तालुक्यातील दाभाडीसह परिसरातील शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळावा या आशेने घरात मोठ्या प्रमाणात कापूस साठवून ठेवला आहे; मात्र अलीकडे बाजारपेठेत कापसाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र, हंगामी कापसापेक्षा फरदडीलाच व्यापाऱ्यांची पसंती असल्याने शेतकऱ्यांसमोर नवेच संकट उभे राहिले आहे. याबाबत प्रशासनाने लक्ष घालून योग्य भाव द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

यंदा कापसाच्या उत्पादनात घट झाली असतानाच शासनाकडून गेल्या महिन्यात कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार ३०० रुपये देण्यात आला होता. काही शेतकऱ्यांनी एवढ्या किमतीवरच समाधान मानून कापूस विकला होता तर काही शेतकऱ्यांनी मात्र आगामी काळात कापसाला किमान सहा हजार रुपये भाव मिळेल या आशेने कापूस विकलाच नव्हता. परंतु, त्यानंतर कापसाचे दर कमी होत गेल्याने शेतकऱ्यांत पुन्हा चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच व्यापाऱ्यांनी कापसाकडे दुर्लक्ष करून फरदड घेण्यावर भर दिल्याने कापूस घेणारे व्यापारी कमी झाले आहेत.

सध्या परिसरात फर्दडीला प्रतिक्विंटल तीन ते साडेतीन हजार रुपये भाव दिला जात आहे. तोच कापूस फेडरेशनला विकून कमाई करीत आहेत. कापसापेक्षा फरदडीच्या कापसाला चांगला नफा मिळत असल्याने व्यापारीही त्याच कापसाची खरेदी करीत आहे. परिणामी खरीप हंगामाचा कापूस शेतकऱ्यांच्या घरात तसाच पडून आहे.

गेल्या काही दिवसांपासून कापसाची खरेदी बंद झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. खरीप हंगामाचा जवळपास साठ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. बाजारपेठेत कापसाला भाव स्थिर नसल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. शेतकऱ्यांच्या घरात पडलेल्या या कापसासाठी शासनाने लक्ष द्यावे आणि या संकटातून त्यांची सुटका करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या घरातील कापसाला कवडीमोलाने विकावे लागेल, यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा नवे संकट ओढावेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.