घरच्या घरी शेती

आजच्या काँक्रिटच्या जंगलात शेती सोडाच साधं हिरवंगार झाडही चक्क शोधावं लागतंय. पण सोसायटी बिल्डिंगच्या गच्चीवर, आपल्या बाल्कनीतही शेती करता येते.

हिरवीगार शेती पाहायला सगळ्यांनाच आवडतं… पण आजच्या काँक्रिटच्या जंगलात शेती सोडाच साधं हिरवंगार झाडही चक्क शोधावं लागतंय. पण सोसायटी बिल्डिंगच्या गच्चीवर, आपल्या बाल्कनीतही शेती करता येते… पालेभाजी लावता येते… हे ऐकाल तर थक्क व्हाल. मुळात शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांचा कचरा गोळा केला जाणार नाही, अशी घोषणा नुकतीच मुंबई महापालिकेने केली आहे. अशावेळी सोसायटीचे सभासद वैयक्तिकरित्या व सोसायटी एकत्रितपणे शहरी शेती तंत्राचा वापर करून आपल्या कचऱ्याचा विनियोग करू शकतील.

शहरी शेती करण्यासाठी काही फार मोठं शिक्षण घ्यावं लागतं असंही नाही. कुणीही ती करू शकतो. रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या भाज्या, फळे यांचा टाकाऊ भाग जो आपण कचराकुंडीत टाकतो, तो तेथे न टाकता ‘शहरी शेती’साठी वापरायचा. त्याशिवाय कोणतेही रासायनिक खते किंवा कीटकनाशक न वापरता, फळं, भाज्या घरच्या घरी पिकवता येतात. या पद्धतीने काम करताना कीड लागणे, मुंग्या लागणे असे प्रसंग ओघानेच येतात. पण त्याचा सामना घरीच मिळणाऱ्या वस्तूंपासून करता येतो. शहरी शेती करताना मर्यादित प्रमाणात पाणी लागते, ही एक जमेची बाजू आहे. त्याशिवाय बाजारातून फारसे काही विकत आणावे लागत नसल्याने ती खर्चिक बाब नाही.

मुंबई शहराबद्दल बोलायचं तर दररोज जवळपास ७००० मेट्रिक टनाच्या कर घनकचरा तयार होतो आणि तो ‘कचरा डेपो’पर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. पण यातील ४० टक्के प्रमाण हे जैविक कचऱ्याचे आहे जो ‘विघटनशील’ असतो. तो कचरा जर कचराकुंडीत गेलाच नाही तर कचरा डेपोपर्यंत पोहोचवण्याच्या खर्चात कपात तर होईल. त्याबरोबरच परिणामी प्रदुषणाला आळा बसल्याने आरोग्याचे प्रश्न कमी होतील. हे ‘शहरी शेती’मुळे होणारे सामाजिक फायदे. डॉ. रमेश दोशी यांच्याच पुढाकाराने होणाऱ्या या वर्गांमध्ये गेल्या बावीस वर्षांत प्रा. दाभोळकर, निळू दामले यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले आहे. हे वर्ग दिलीप हेर्लेकर आणि मृणालिनी साठे घेत असून त्याद्वारे ‘शहरी शेती’चा प्रसार करत आहेत. – प्रदीप म्हात्रे

येत्या रविवारी ओळखवर्ग
गच्ची, बाल्कनी, खिडकीच्या ग्रिलमध्ये जेथे किमान चार तास किंवा त्यापेक्षा जास्त सूर्यप्रकाश उपलब्ध आहे अशा ठिकाणी झाडे लावून फळं, भाज्या, पालेभाज्या, फुले यांचे घेतले जाणारे उत्पादन म्हणेजच शहरी शेती. डॉ. रमेश दोशी यांनी तर ‘शहरी शेती’चे पेटंट घेतले. भाजीपाला, फळे लागवडीचे हे तंत्र शिकवण्यासाठी येत्या रविवारी ७ जानेवारी रोजी ओळखवर्ग घेण्यात येणार असून दिलीप हेर्लेकर त्यात मार्गदर्शन करतील. सोसायटीचे सभासद वैयक्तिकरित्या आणि सोसायटी एकत्रितपणे या तंत्राचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२. दूरध्वनी : २४०५४७१४ किंवा २४०५७२६८ यावर संपर्क साधता येईल.