१९९३च्या बॉम्बस्फोटाचे ‘षड्यंत्र’उघड होणार,डी कंपनीचा टकल्या सापडला

सामना ऑनलाईन, मुंबई

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील फरारी आरोपी आणि दाऊद इब्राहिमचा खास पंटर फारुख टकल्या अखेर सापडला. बॉम्बस्फोट घडवून हिंदुस्थानबाहेर पळालेल्या टकल्याला २२ वर्षांनंतर पकडण्यात सीबीआयला यश मिळाले. तो दुबईत लपून बसला होता. तेथेच त्याच्या मुसक्या आवळून आज त्याला मुंबईत आणण्यात आले. फारुखच्या अटकेमुळे मुंबई बॉम्बस्फोटाचे षड्यंत्र उघड होणार आहे.

१९९३ मध्ये मुंबईत महाभंयकर साखळी बॉम्बस्फोट घडविल्यानंतर दाऊदसह फारुख टकल्याने हिंदुस्थान सोडला होता. बॉम्बस्फोटात फारुखचे नाव समोर आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी हिंदुस्थान सरकारने इंटरपोलची मदत घेतली होती. १९९५ मध्ये इंटरपोलने फारुख टकल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती, पण तो काही सापडत नव्हता. अखेर २२ वर्षांनंतर त्याला पकडून मुंबईत आणण्यात सीबीआय यशस्वी झाली. टकल्या हा दाऊदचा एकदम खास माणूस असून त्याच्या विरोधात दहशतवादी कट रचणे, हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंबई बॉम्बस्फोटाच्या प्रमुख सूत्रधारांपैकी फारुख टकल्या एक आहे. १२ बॉम्बस्फोट मुंबईत कुठे आणि कसे घडवायचे ही योजना आखण्यात त्याची प्रमुख भूमिका होती. त्यामुळे त्याची अटक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. दुबईहून मुंबईत आणल्यानंतर त्याला टाडा कोर्टाचे विशेष न्यायाधीश जी. ए. सानप यांच्यासमोर आज हजर करण्यात आले असता त्याला १९ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.

डी कंपनीला मोठा झटका

सीबीआयने फारुख टकल्याला अटक करून मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. डी कंपनीसाठी हा मोठा झटका आहे. टकल्या १९९३ च्या बॉम्बस्फोटात सहभागी होता. स्फोटाचे धागेदोरे दुबईपर्यंत पोहचले होते-उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

प्रवास आणि राहण्याची व्यवस्था केली

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट केल्यानंतर या स्फोटांचा कट रचणाऱयांना हिंदुस्थानबाहेर पळून जाण्यासाठी त्यांच्या प्रवासाची तसेच त्यांना दुबईत राहण्याची व्यवस्था फारुखने केली होती असा त्याच्यावर आरोप आहे. तसेच तो दुबईत राहून डी कंपनीचा व्यवहार सांभाळत होता.