फॅशनेबल शाल

>>पूजा पोवार, फॅशन डिझायनर<<

आजच्या मॉडर्न आजीचा रुबाब वाढविण्यासाठी उबदार शाल.

आजीची शाल… जिला मायेची ऊब… खानदानीपणाचा आदब…शालींमुळे सौदर्य वाढवायलाही मदत होते. शालीनता वाढवणारं हे पुरातन वस्त् आहे. त्यामुळे घराण्याची परंपराही टिकवली जाते. सध्या बाजारात आजींसाठी सौंदर्य वाढणाऱया अनेक प्रकारच्या शाली उपलब्ध आहेत.

शालींमुळे शरीराला ऊब मिळतेच, शिवाय पेहरावाला उठाव येतो आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व चारचौघांत उठून दिसायला, रुबाबदार दिसायला मदत होते. काही ठिकाणी हे खानदानी वस्त्र मानले जाते. शाल घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी वापरता येते.  पूर्वी नऊवारी साडी नेसल्या जायच्या त्यावरही शाल वापरली जायची.

 कश्मीरपासून शालींची संस्कृती उदयास आली. आजही जगभरातील स्त्रीया आवडीने अंगावर शाल पांघरतात. शाल हा शब्द ‘शती’ या शब्दापासून तयार झाला आहे. जामेवार, कनिकार, पाशिमा, दुरुक्खा अशा अनेक प्रकारच्या शालींचे प्रकार जगभरात आढळतात. दुरुक्खा शालीचे वैशिष्टय़ असे की, ती दोन्ही बाजूने विणलेली असते. त्यामुळे तिचा वापर दोन्ही बाजूने करता येतो. शातूश या प्रकारची शाल सर्वात महागडी मानली जाते. पूर्वीच्या काळी या शाली प्रसिद्ध होत्या.

शाल वेगवेगळ्या पद्धतीने कशी वापराल ?

> स्कार्फ, स्टोल यांचा वापर दागिन्याप्रमाणेच केला जातो.

> प्रत्येक वयोगटातल्या महिला याचा वापर करू शकतात.

> पाश्चिमात्त्य आणि पारंपरिक दोन्ही प्रकारच्या पोषाखांवर शाल उठून दिसते.

> डेनिम, साडी, चुडीदार, कोणत्याही प्रकारच्या कपडय़ांवर अंगावर शाल पांघरली जाते.

शालीची गरज

> स्वेटरपेक्षा ती अंगावर पांघरायला उपयोगी आहे.

> हिवाळ्यात वापरता येणारं अतिशय साधं सोपं वस्त्र.

> भेटवस्तू म्हणून देण्यासाठीही शालींचा वापर करता येतो.

कश्मिरी शाल

या खूप मऊ, मुलायम असतात. सिल्कच्या असतात. बऱयाचशा शालींवर कश्मिरी नक्षीकाम केलेले असते. कश्मिरी शाल अंगावर पांघरली की,स्त्रीला एक वेगळ्याच प्रकारचे सौंदर्य आणि आदब प्राप्त होतो.

निट शॉल वा वुलन शॉल

स्वेटरच्या लोकरीप्रमाणे लोकरीच्याच जाड किंवा बारीक धाग्याने या विणल्या जातात. थंडीपासून रक्षण करण्यासाठी ही शाल वापरली जाते. नेहमीच्या शालीपेक्षा लांबच्या लांबही या विणलेल्या असतात.

स्टोल

शिफॉनच्या कपडय़ापासून शक्यतो स्टोल तयार केले जातात. यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंट वापरून नक्षीकाम केले जाते. आपल्या पेहरावाला शोभेल त्याप्रमाणे अनेक प्रकारचे स्टोल बाजारात उपलब्ध आहेत. याचा वापर शालीप्रमाणेच सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये करता येतो.

क्रोशाची शाल

क्रोशाच्या सुईने लोकर किंवा वेगवेगळ्या रंगांच्या दोऱयांनी या शाली विणल्या जातात. यामध्येही अनेक प्रकारच्या डिझाईन विणलेल्या असतात. थंडीत वापरण्याऐवजी पेहरावाचे सौंदर्य वाढवायला या शालींची मदत होते.

आजीालींचं नातं

पूर्वी नऊवारी, सहावारी साडय़ा नेसल्या की, अंगावर शाल घेण्याची प्रथा होती. प्रवासात, घरात, कुठेही ती वापरली जायची. त्यामुळे प्रत्येकाचं आपापल्या वस्तूंशी जसं एक वेगळ्याच प्रकारचं नात असतं अगदी तसंच शालीचं आणि आजीचं एकमेकांशी दृढ नातं असतं. तिने वापरलेल्या या शालींचं नातं पिढीजात पुढे सरकत जातं. आजही काही घरांत अशा शाली वर्षानुवर्षे जपून ठेवल्या जातात. कारण आजीच्या शालीतून प्रेमाची ऊब, माया अनुभवता येते.