फॅशन : आजीच्या कुड्या


>>पूजा तावरे, फॅशन डिझायनर

मोत्याच्या किंवा हिऱ्याच्या कुड्या मराठमोळा पारंपरिक दागिना. खास आपल्या आजीचा अलंकार. आज बदलत्या काळानुसार या कुड्याही आधुनिक झाल्या आहेत.

पूर्वी आजी म्हटल्यावर साधारण साडी, हातात काचेच्या बांगडय़ांबरोबर सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, गळ्यात मंगळसूत्राबरोबर बोरमाळ किंवा एकदाणीचा पदर, कानात मोत्याच्या कुड्या, पायात जोडवी ही सर्व अगदी साडीला मॅचिंग होणारी आभूषणे आजी डोळ्यासमोर येत. एक नऊवारी नेसलेली, सतत कामात असलेली, शांत, केसांचा अंबाडा, हातात हिरवा चुडा, दोन पाटल्या, कमरेत चाव्यांचा जुडगा, पायात जोडव्या, चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यांत आभाळभर माया अन् यामध्ये अधिक लक्ष जाणारी गोष्ट म्हणजे आजीच्या कानातील कुड्या. आजीच्या कानांच्या पाळीला नाजूक कुडी अत्यंत शोभून दिसते. आपल्या आई-आजीनं वापरलेल्या कुड्या हल्ली पुन्हा बाजारात पाहायला मिळतात. नवीन लूकमधल्या नथींची फॅशन जोरात आहे

ही कानातील कुडी सोने आणि मोत्यांनी गुंफलेली असायची. काही वेळेला बाजूने मोती आणि मध्ये डाळिंबी खडा किंवा मग सगळेच मोती. कानातल्या कुडीमुळे चेहऱ्यावर येणारी खानदानी आदब, सात्त्विकता शोभून दिसते आणि त्या सतेज मोत्याबरोबर चेहऱ्यावरचे भावही लोभसवाणे दिसतात. कुड्या हा हिंदुस्थानातील व विशेषतः महाराष्ट्रातील दागिना आहे. स्त्रियांचे कानात घालण्याचे सोन्याचे आभूषण. कुडय़ांचा आकार गोल व फुलासारखा असतो.

‘कुडी’ हा शब्द देहाशी साधर्म्य करणारा आहे. देखणी मोत्याची कुडी आजीच्या कानात मिरवण्याचे कर्णभूषण. सोन्याचे किंवा मोत्याचे 6-7 मणी वापरून केलेल्या फुलासारखा आकाराच्या कर्णभूषणांना कुडी म्हणतात. कुडय़ांव्यतिरिक्त कर्णफुले, भोकर, झुबे, झुंबर, बाळी, वेल यांसारखी आभूषणेही कानात घातली जातात. कुड्या या विवाहित स्त्राrच्या सौभाग्याचे लक्षण मानले जातात.

काळानुसार सध्या मॉडर्न आजीसाठी सोन्या-मोत्याबरोबरच हिरे, खडे, इमिटेशन प्रकारात कुड्या उपलब्ध आहेत. त्याबरोबरच यामध्ये असंख्य डिझाइन्सदेखील पाहायला मिळतात. साडीबरोबरच कुर्ता, ड्रेसवरदेखील कुड्या मस्त दिसतात. सध्या विविध पर्याय उपलब्ध असल्याने विविध रंगांतील कुड्या मॅचिंग ड्रेसवर वापरता येणार आहेत. त्यासह छोटय़ा-मोठय़ा आकाराच्या, विविध रंगांच्या कुड्या बऱ्याच ठिकाणी मिळतात. जुन्या पद्धतीच्या कुडीमध्ये थोडा बदल करून या नव्या लूकच्या कुड्या आवडीनं वापरत आहेत. थोडा आधुनिक लूक असल्यामुळे फक्त साडीवरच नाही, तर कुर्तीवरही त्या उठून दिसतात.

> कुड्या हा अलंकार पेशवाई काळापासून खूप लोकप्रिय झाला तो आजतागायत. कान टोचल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. मोती हे चंद्राचे रत्न असल्यामुळे मन आणि डोकं दोन्ही शांत, शीतल राहाते.

> कुडय़ांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सोन्याच्या धातूमुळे सात्त्विकता वाढते. शुद्ध सोन्याचे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात.

> आजची आधुनिक आजी आपल्या कुडय़ांना खूप जपत असते. कुड्या जरी हिऱ्याच्या केल्या जात असल्या तरी कुडी ही मोत्यांचीच असते.

> गानसम्राज्ञी लता मंगेशकर नेहमी कानात हिऱ्याच्या कुड्या घालतात.

> कुड्या कोणत्याही पोशाखाचे सौंदर्य खुलवतात. रेशमी साडी, आधुनिक कुर्ती, अगदी सुटसुटीत वेस्टर्न पोशाखावरही ही पारंपरिक कुडी आधुनिक होते.