आम्हीही फॅशनेबल!

फॅशन शो म्हणजे ग्लॅमर, झगमगाट… यंदाच्या आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त आज विकलांगांसाठी आगळावेगळा फॅशन शो केला जाणार आहे.

फॅशन शोच्या रॅम्पवर चालणाऱ्या उंच, आकर्षक, सडपातळ बांध्याच्या मॉडेल्स तर साऱ्यांनाच पाहायला आवडतात. मात्र यंदा आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त एमबीए फाऊंडेशन आणि सेल्फ इस्टीम फाऊंडेशन फॉर डिसॅबल्ड या सामाजिक संस्थांतर्फे प्रथमच व्हीचलेअरवरून विकलांग ‘स्ट्राईड 2018 वॉक विथ डिग्निटी’ हा फॅशन शो सादर करणार आहेत.

अपंग व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या या फॅशन शोविषयी जयश्री शिंदे सांगतात, अपंग व्यक्तीही आपल्या समाजाचा एक भाग आहेत. आम्हालाही अपंगांचा फॅशन शो साजरा करायला मिळत आहे ही आमच्यासाठी फारच वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे अपंगत्वाबाबत समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी मदत होईल. त्यांनाही  अशा प्रकारचे उपक्रम राबवून त्यांच्या या इच्छा पूर्ण कराव्यात असे आम्हाला वाटते.

विकलांग मुलांसाठी होणाऱ्या फॅशन शोचं वैशिष्टय़ असं की, यामध्ये सहभागी होणाऱ्या अपंग मुलांना शोभतील अशा पोषाखांचा कधीच कोणी विचार केला नव्हता, पण त्यांच्यासाठी गाऊन, शिवाय त्रास न होता घालता येतील असे बूट, कुर्ता-पायजमा असे अगदी साधे कपडे तयार केले आहेत. अशा प्रकारे फॅशन डिझायनर वेगळ्याच पद्धतीने त्यांना साजेसे पोषाख तयार करत आहेत. यासाठी प्रथमच फॅशन जगतातील नावाजलेल्या अर्चना कोचर आणि वारिजा बजीज यांनी व्हीलचेअरवरील मॉडेल्स आणि अपंग तरुण मुलांचे कपडे डिझाइन केले आहेत. फॅशन रॅम्पवर विकलांग मुलामुलींसह माजी मिस इंडिया आणि माजी मिस्टर इंडिया रॅम्पवर चालणार आहेत. शिवाय समाजातील प्रतिष्ठत व्यक्ती आणि सुप्रसिद्ध अभिनेता, अभिनेत्रींचाही समावेश असणार आहे. इतर अपंग व्यक्तींना या फॅशन शोमधून कशी प्रेरणा मिळेल असे विचारता जयश्री शिंदे सांगतात, ज्या अपंग व्यक्ती यामध्ये सहभागी झाले नाहीत, त्यांनाही अशा फॅशन शोमधून नक्कीच प्रेरणा मिळेल. आम्हीही काहीतरी वेगळं करून दाखवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण व्हायला नक्कीच मदत होईल.

स्वतःतील क्षमतेची ओळख

या फॅशन शोमध्ये अपंग, गतिमंद, मतिमंद अशा 18 ते 50 वयोगटातील एकूण 35 स्त्री-पुरुष सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळेल. शिवाय त्यांच्यातील क्षमतेची ओळखही होईल. त्यांच्या सशक्तीकरणासाठी उचललेलं हे एक पाऊल आहे.