आजोबांसाठी रुबाबदार पोशाख

सामना ऑनलाईन 

अनेकदा आजोबांना ‘कॅज्युअल कपडे’ कोणते घ्यायचे हा प्रश्न पडतो. मात्र त्यांच्यासाठी आरामदायी, सहज हालचाल करता येतील असे कपडे बाजारात उपलब्ध असतात. अशा कपड्य़ांची माहिती ज्येष्ठांना नसल्यामुळे असे कपडे विकत घेण्यात अडचण येते. रुबाबदार आणि डौलदार व्यक्तिमत्त्वासाठी नवीन ट्रेंडचे, फॅशनेबल कपडे वापरण्याचीही हौस हवी.

वय वर्षे ६० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले आजोबाही कपड्य़ांची स्टाइल, फॅब्रिक, कपड्य़ावरील प्रिंट आणि डिझाइन याबाबत सजग असतात. हलक्याफुलक्या कपड्य़ांच्या माध्यमातून नवनवीन, हल्लीच्या काळातील बदललेल्या नव्या फॅशनचाही आनंद घेऊन आपला ‘लूक’ बदलू शकतात. कारण पोषाखाचा बदलता ट्रेंड हा कोणत्याही वयात आवडीनुसार वापरता येतो. जेणेकरून प्रौढ वयातही देखणं आणि रुबाबदार दिसायला मदत होईल. याकरिता नवीन शैलीचे कपडे निवडावेत.

कॅज्युअल कपड्य़ाची गरज

निवृत्तीनंतर घरीच राहात असल्यामुळे फॉर्मल कपड्य़ांची (शर्ट-पॅण्ट) गरज कमी होते. शिवाय वय वाढलेले असल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता किंवा घाम येण्याचे प्रमाणही जास्त असू शकते. अशा वेळी मोकळे कपडे घालण्याची गरज निर्माण होते. महत्त्वाचे म्हणजे या वेळी कार्यालयीन काम फारसे करावे लागत नाही. घरीच असल्यामुळे या कपड्य़ात घरची कामे करणे सोयीचे जातेच शिवाय हल्ली कॅज्युअल कपड्य़ांमध्ये काही पार्टी वेअरही आहेत. जेणेकरून यामध्ये आरामदायीही वाटेल यासाठी कॅज्युअल कपड्य़ांची आवश्यकता असते.

सौंदर्य टिकवण्यास मदत

अशा कपड्य़ांमुळे व्यक्तिमत्त्वाला नेहमीपेक्षा वेगळे सौंदर्य प्राप्त होते. शरीरही रुबाबदार, आकर्षक दिसते. त्यामुळे आपल्या रंगाला शोभतील असे कपडे बाजारात मिळत असतात. यामध्ये लोकर कोट, लहान जॅकेट, विविध प्रकारच्या थ्री-फोर्थ, लांब हाताचे, छोट्य़ा हातांचे जीन्स-टी-शर्ट, बाही असलेले किंवा नसलेले असे वेगवेगळ्य़ा प्रकारचे कपडे जे तारुण्याचा लूक देतात.

कॅज्युअलमध्येही अनेक पर्याय

पूर्वी गुलाबी रंगात पुरुषांचे कपडे कधीच दिसायचे नाहीत, पण आता हे चित्र बदललंय. अप टू डेट, स्मार्ट, कॅज्युअल, स्टायलीश अशा वेगवेगळ्य़ा पर्यायांचा विचार ज्येष्ठांच्या कपड्य़ांमध्येही निर्माण झाले आहेत. यामध्ये हल्ली गुलाबी रंगाला उठाव येऊ लागलाय. यामध्ये गडद फिकट छटांमध्ये शर्टस, टी-शर्टस, कुर्ते, झब्बे यांचाही समावेश आहे.

– पायघोळ किंवा पायांना न चिकटणाऱया वैविध्यपूर्ण फॅब्रिक्स आणि स्टाईलीशच्या पॅण्ट सध्या विकत मिळतात. ज्येष्ठांसाठी सोयीच्या आहेत.
– अनेक रंग आणि प्रिंटचे टी-शर्ट कॅज्युअल कपडे म्हणून वापरता येतात.
– पुरुषांमध्ये फॉर्मल सूटप्रमाणेच कॅज्युअल राऊंड नेक किंवा व्ही नेक टी-शर्ट आणि पायात लोफर शूज, स्नीकर शूज घालण्याची पद्धत आहे.
– कॅज्युअल पेहरावात वॉश्ड डेनिम फॅब्रिक हाही एक पर्याय आहे. वॉश्ड डेनिम म्हणजे आपल्या जीन्स किंवा डेनिम जॅकेटवर एका विशिष्ट प्रकारचे शेडिंग दिसते त्याला वॉश्ड डेनिम म्हणतात.
– फॉर्मल वेअरमध्ये जसे प्लेड चेक्स, स्ट्रइप्ड फॅब्रिक्स तर कॅझ्युअल वेअरमध्ये हवाईयन प्रिंटेड शर्टस् वेगवेगळय़ा डिझाइनमध्ये मिळतात.

कॅज्युअल कपड्य़ांची फॅशन

– काही कपड्य़ांवर कार्टून प्रिंटस्, उठावदार रंगातील ऍब्स्ट्रक्ट प्रिंटस् असतात. आवडीनुसार हा पर्याय वापरू शकता.
– आपल्या वॉर्डरोबसाठी नेहमीच काळय़ा, लाल आणि निळय़ा रंगाला मागे सारून अल्ट्रा वॉयलेट रंगांचीही निवड करू शकता. सध्या बाजारात पुरुषांच्या कपडय़ांमध्ये अल्ट्रा वॉयलेटचा ट्रेंड आहे.
– दोन टोन असलेला मॅट फिनिशचा जांभळय़ा रंगाचा शर्ट हा कॅझ्युअल लूकसाठी किंवा कुटुंबीय आणि मित्रमंडळींबरोबर पार्टीसाठी एक उत्तम पर्याय आहे.
– कॅज्युअल डेनिम आणि क्रिस्प शर्ट अशा कोणत्याही कपडय़ांसोबत डफल बॅगही चांगली दिसते.
– जॉगिंगला जाण्याकरिता कॅज्युअल वेशभूषेत नेटेड किंवा विणलेल्या सुताच्या कपडय़ाच्या जॉगिंग पँण्ट परिधान कराव्यात. यामुळेही मोहकपणा येतो.
– व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यासाठी ट्रेंडी रंग, साजेसी झिपर, प्रिंटसचा वापर करा.

‘माझा मराठीची बोलू कौतुके’ किंवा ‘ने मजसी ने’, ‘मी मराठी’, यांसह पाडगावकरांच्या ‘सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत’ या काव्यपंक्ती कॅलिग्राफीत टी-शर्टवर उमटल्या तर आजोबाही त्यांच्या मित्रमंडळींमध्ये मिरवू शकतील.