उबदार फॅशन

>>पूजा तावरे, फॅशन डिझायनर<<

आजकालची थंडीही फॅशनेबल झाली आहे. केवळ शॉल आणि स्वेटर ही संकल्पना कधीच बाद झालीय.

पांढऱ्याशुभ्र धुक्यासह हुडडुडी भरविणारी गुलाबी थंडी आता अवतरू लागली आहे. आजकाल फॅशनमध्ये डिफरंट आणि हटके दिसण्यासाठी नवनवीन फॅशनला पसंती दिसून येत आहे. नेहमीच्या टिपिकल शॉल्स, स्वेटरपेक्षा सध्या युनिक अशा विंटरवेअर्सना पसंती मिळत आहे. यामध्ये डेनिम हाफ जॅकेट्स, वेगवेगळ्या स्टाईलचे श्रग्ज, फ्री साईजचे पोंचू, वुलन कुर्ताज, फर ड्रेसेस, लेदर अँकल बूट, राजस्थानी डिझाईन असलेल्या कलरफुल हाफ जॅकेटची चलती दिसून येत आहे. हिवाळ्यात विविध प्रकारचे, रंगीबेरंगी मफलर्स, स्टोल गळ्यात घालून ट्रेंडी लूक बनवण्यावर तरुणांचा भर दिसत आहे. मोठय़ा हाताचे, रिबीन असलेले पुलओव्हर खूप चांगले दिसतात. तसेच कार्डिगन्स, स्वेटर वेस्टस् यांसारख्या प्रकारांनाही मागणी आहे. सध्या थंडीसाठी ऊबदार वुलनच्या कुर्त्यांसह ऊबदार लेगिंग्जही पाहायला मिळतात. यामध्ये विविध रंग असून दिसायला अत्यंत स्टायलिश अशाच आहेत. या स्वेटर्सबरोबरच श्रग्जचीदेखील फॅशन पाहायला मिळत आहे.

लेदर जॅकेट्स

थंडी असो वा नसो, हे जॅकेट आजकाल प्रत्येकीला हवंच असतं. सध्या सेलिब्रेशनचा, सुट्टय़ांचा सीझन सुरू आहे. त्यामुळे कुठल्याही थंड हवेच्या ठिकाणी जाताना ही जॅकेट्स तुम्हाला नक्कीच स्टायलिश लूक देतील. या जॅकेटमध्ये लाँग आणि शॉर्ट असे दोन प्रकार येतात. त्याच्या किमतीही परवडण्यासारख्या आहेत. डेनिम जॅकेटस्ही ट्राय करायला हरकत नाही. जीन्सवर आजकाल सर्रासपणे लेदर जॅकेट वापरले जाते. लेदर जॅकेटमध्ये खास रंगसंगती व डिझाईन्स आहेत. जम्पसूट हा प्रकारही सध्या खास थंडीच्या कलेक्शनसाठी प्रसिद्ध आहे, पण चेक्स किंवा नक्षीच्या जम्पसूटपेक्षा संपूर्णतः एकाच रंगाचे जम्पसूट सध्या विशेष लोकप्रिय आहेत.

स्टाय़लिश स्कार्फ

थंडी सुरू झाल्यानंतर स्कार्फची मागणी दिसून येते. थंडीपासून बचाव करण्याबरोबरच स्टायलिश दिसण्यासाठीदेखील स्कार्फला पसंती मिळत आहे. सध्या पॉकेट स्कार्फची फॅशन इन आहे. या स्कार्फमध्ये पॉकेट दिले जाते, ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही वस्तू कॅरी करता येते. ऍक्रॅलिक यार्नपासून तयार करण्यात आलेले हे स्कार्फ मोठय़ा साईजमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये विविध डिझाईन्ससह पॉकेट शेप डिझाईन आणि एम्ब्रॉयडरीमध्ये अनेक प्रकार दिसून येतात. तसेच तुम्ही जर फ्लोरल प्रिंट ड्रेसेस वापरत असाल तर यावर विंटर फ्लोरल स्कार्फमुळे तुम्हाला एक डिफरंट लूक मिळतो. यामध्ये छोटय़ा व मोठे फ्लॉवर, मिक्स आणि काँट्रास्ट मिक्स कलरमध्ये फ्लॉवर मिळतील.

डिझायनर टोपीमुळे थंडीत फॅशनेबल लूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. थंडीतही फॅशनेबल आणि हॉट लूकसाठी या टोप्यांना महिलावर्गाकडून खास पसंती मिळत आहे. किमती जरी महाग असल्या तरी थंडीतील हॉट लूकसाठी ही किंमत जास्त नाही.

क्लासिक एनिमल

एनिमल प्रिंट्सला सर्व सीझनमध्ये मागणी दिसून येते. एनिमल प्रिंट्समुळे तुम्हाला एक स्टायलिश व क्लासिक लूक मिळतो. एनिमल प्रिंट्सच्या डिझाईनमध्ये युरोपियन स्टाईल दिसून येते. यामध्ये एनिमल स्किन प्रिंटस्, एनिमल स्कॅच, पॅचेस इत्यादी फ्लोरल प्रिंटमध्ये मिक्स केलेले दिसून येतील.

वुलनची कॅप वेगवेगळ्या रंगांत मिळतात. कॉन्ट्रास्ट रंगाचे छोटे छोटे बाहुले यावर तयार करण्यात आले आहे. थंडीत शरीराला ऊब देणाऱ्या या कॅपची सध्या तरुणींमध्ये क्रेझ आहे. ऑकॉलेजच्या लूकमध्ये ही कॅप परफेक्ट आहे. कॅप पॅटर्नची टोपी महिलांच्या पसंतीच्या रंगामध्ये तयार करण्यात आली आहे. वुलन आणि फरचे कॉम्बिनेशन असल्याने ही कॅप अजून सुंदर आणि आकर्षक झाली आहे. वुलनच्या टोपीला आतल्या भागात फर लावण्यात आली आहे. त्यामुळे अधिक ऊबदार बनविण्यास मदत होते. या सोबतच डिझायनर लूक देण्यासाठी वुलनच्या बो-वर कॉन्ट्रास्ट कलरचे स्टोन लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी चमकणारे हे स्टोन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. या कॅप पॅटर्नच्या टोप्या लाल, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांत उपलब्ध आहेत.