आजीसाठी फॅशनेबल पर्स

पर्स, बटवा… समस्त महिला वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय. आजच्या फॅशनेबल आजीच्या सोयीची पर्स कोणती…?

र्सेस, बॅग… सगळ्याच महिलांची जिव्हाळ्याची, आवडीची वस्तू… प्रत्येकीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू बॅगेत सामावलेल्या असतात. नेहमी वापरण्यासाठी, बाहेरगावी जाण्यासाठी, स्वतःच्या महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी किंवा अगदी जुजबी वस्तू ठेवण्यासाठीही पर्सची गरज लागतेच. आजींच्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील असे अनेक प्रकारचे फॅशनेबल बटवे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यांना अगदी छोटासा बटवाही आपले सामान ठेवण्यासाठी पुरतो. प्रत्येक वेळी खांद्यात लटकवणारी पर्स वापरायची आवश्यकता असेच असे नाही. फक्त हा बटवा किंवा हँण्डबॅग आपल्या हातात घेऊन आरशात बघून ठरवावे.

सुंदर, विविधरंगी, आकर्षक बटव्यांचा वापर त्या लग्न समारंभ, घरगुती किंवा सार्वजनिक कार्यक्रमावेळी करू शकतात. त्यामध्ये त्या आपले अत्यंत महत्त्वाचे, तातडीने लागणारे सामान उदा. पैसे, चष्मा, टिकलीचं पाकीट, त्वरित लागणारी औषधं, पाण्याची बाटली इत्यादी सामान ठेवू शकतात.

  • बॅगेची निवड कशी कराल?
  • कोणत्या प्रसंगी, कोणत्या ड्रेस किंवा साडीवर आणि कोणत्या कामासाठी तुम्ही बाहेर जाताय, यानुसार पर्स किंवा बटव्याची निवड करावी.
  • पर्स मुळात हलकी असावी. त्यामुळे सामान ठेवल्यावर ती जास्त जड होणार नाही. कारण मुळातच वजनाने जड बॅग सामान ठेवल्यावर अजून जड होते.
  • आपण कोणत्या कामासाठी बाहेर जातोय उदा. लग्न समारंभ, पार्टी, वाढदिवस, परदेश प्रवास जाताना जेवढे सामान बॅगेत मावेल त्यानुसार तिचा आकार केवढा हवा हे ठरवून विकत घ्यावी.
  • बाजारात जायचे असल्यास शक्यतो हलक्या कापडी बॅगेचा वापर करावा. हल्ली भरतकाम, नक्षीकाम केलेले अनेक आकारातले पाऊचेस, बटवे उपलब्ध आहेत. जे वजनाने हलके आहेत. सामानही भरपूर राहते.

टोट बॅग
मध्यम आकाराच्या आणि खांद्यावर सहज घेता येणाऱ्या या बॅगेचा टोट नावाचा प्रकार सर्वच वयोगटाच्या स्त्रीयांमध्ये प्रसिद्ध आहे.

स्लिंज बॅग
छोटीशी आटोपशीर बॅग. रेल्वे, बसने प्रवास करताना, डॉक्टरकडे जाताना ही बॅग सुटसुटीत वाटते. त्यात ‘हाफमून बॅग’, ‘मफ बॅग’ असे प्रकारही आहेत.

क्लच बॅग
पार्टीला जाताना ‘टच-अप’चं सामान, थोडे पैसे, मोबाइल आणि एखादं क्रेडिट कार्ड इतक्याच गोष्टी मावतील अशी ही छोटी बॅग मस्तच असते.

डफल बॅग
छोट्या हँडलच्या या बॅग्ज लहान प्रवासाला वापरायला सोयीच्या असतात. एका डफल बॅगमध्ये आवश्यक सामान घेतले की छान वाटते.