मनातली गोष्ट

टॅटू… आजच्या तरुणाईची फॅशन. ही संकल्पना केवळ फॅशनपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. काढलेल्या टॅटूतून आपली मन की बात प्रिय व्यक्तीपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवायची असते. आपल्या मराठी बायकाही टॅटू काढण्यात काही मागे नाहीत. लेकावरचे निरतिशय प्रेम आजची आधुनिक आई टॅटूतून दर्शविते. नवऱ्यावरचे मनस्वी प्रेम, कामाची, करीयरची ओढ, आईविषयीचा अकृत्रीम जिव्हाळा, बहिणीची माया… काय नसते या टॅटूमध्ये…

प्रेरणादायी ‘मा’

1

आम्ही तिघी बहिणी. लहानपणीच वडील वारले. अशावेळी आई-वडिल अशी दोघांची जबाबदारी माझ्या आईने सांभाळली. आमचे छोटे-छोटे हट्ट पुरवण्याचा ती नेहमीच प्रयत्न करत आली. तिने केलेले कष्ट आणि ते करत असताना परिस्थिती शिक्षणाच्या आड तिने कधीच येऊ दिली नाही. अनेकांच्या हातावर मी टॅटू पाहिले होते. थोडी भीती वाटत होती. पण तो काढण्याचा मोह काही केल्या कमी होत नव्हता. अखेर एक दिवस टॅटू काढायचा असं ठरवूनच टाकलं. पुन्हा प्रश्न पडला नेमका कोणता टॅटू काढायचा. वेगवेगळ्या डिझाईन्स मला दाखवल्या होत्या, पण त्या मनाला पटत नव्हत्या. आईचे कष्ट फार जवळून पाहिले होते. त्यामुळे ‘मम्मी’ असे नाव मनत आले आणि हातावर ‘मा’ हा टॅटू काढला. दोन वर्षे झाली आज टॅटू काढून… हा टॅटू माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. मला त्यातून प्रेरणा मिळत असते.

>>दीपिका नाईक

 

आयुष्यभराचे गिफ्ट ‘दुर्वा’

2

सगळ्याच गोष्टी बोलून व्यक्त करता येत नाहीत. प्रत्येक आईला आपल्या बाळाचं कौतुक असतंच… मलाही आहे. तिचा जन्म झाल्यापासून तिच्याविषयी वेगवेगळं नियोजन डोक्यात आखून ठेवलंय. तिच्यासाठी काय करु, काय नको असंच झालं होतं. खरं तर दुर्वाचा जन्म झाला त्याच दिवशी हातावर टॅटू काढायचा असा विचार केला होता. पण शारिरीकदृष्टय़ा ते शक्य नव्हतं. म्हणून तिच्या जन्मानंतर सहाव्या महिन्यात मी दुर्वाच्या नावाचा टॅटू हातावर काढला. प्रचंड वेदना होत होत्या, पण त्या क्षणिक होत्या, त्याचा आनंद मला आयुष्यभरासाठी मिळणार होता. कारण तिचं नावं माझ्यासोबत आयुष्यभरासाठी राहणारं आहे. खरं तर ते आयुष्यभराचे गिफ्टच आहे. त्यामुळे माझ्या हातावर ‘दुर्वा’ असा तिच्या नावाचा टॅटू काढला आहे. दुर्वा ही माझ्यासाठी उत्साह, आनंद आहेच, पण ती माझा शीण नाहीशी करणारी माझी मुलगी.

>>अश्विनी रासम-देऊलकर

 

नवऱ्यावरचे प्रेम ‘अंकित’

3

रं तर लग्नाआधीपासून मला टॅटू काढण्याची इच्छा होती, पण माझ्या आईने कधी परवानगी दिली नाही. पण लग्नानंतर माझी ती इच्छा मी पूर्ण केली. माझ्या नवऱ्याच्या मानेवर जलपरीचा टॅटू पाहिला होता, त्याचं टॅटू प्रेम पाहून मलाही राहावलं नाही. मीही टॅटू काढणार असं ठरवलं होतंच. लग्नानंतर आम्ही गोव्याला गेलो होतो. नवऱ्याला मार्केटमध्ये शॉपिंगसाठी जाते असं सांगून निघाले होते. त्यावेळी तो रुममध्येच होता. नवऱ्याला याची कल्पनासुद्धा नव्हती. रुममध्ये गेले तेव्हा हातावरचे त्याचे नाव दाखवून त्याला एकदम सरप्राईज केलं. त्याचं नाव मी माझ्या हातावर कायम स्वरुपासाठी काढलं आहे. मी हातावर त्याचं नावं काढलेलं बघून तोही थक्क झाला होता. कारण मी शॉपिंगसाठी गेले होते आणि हातावर त्याचे नाव काढून आले होते.

>>अंकिता चौहान-दोशी

 

योगिक असल्याचे संकेत

4

माझं योगाभ्यासावर प्रचंड प्रेम आहे. त्याबाबत मी सतत अपडेट असते. त्यामुळे माझ्या अंगावर मी योगाचे विविध प्रकारचे टॅटू काढून घेतले आहेत. माझ्या हातावर ड्रिम कॅचर, सात चक्रांची अक्षरे, मेडिटेशन माळ, नक्षत्र असे टॅटू आहेत. ड्रिम कॅचर हे एक सकारात्मक चिन्ह आहे. ते दुःस्वप्नांपासून दूर ठेवतं आणि मुक्त पक्षी असल्याचे ते चिन्ह आहे. सात चक्रांची अक्षरे शरीरातील चक्र समतोल ठेवतात आणि शरीर, मन आणि आत्मा शांत ठेवतात. योगा मेडीटेशन माळ योगाबद्दल असलेले प्रेम व्यक्त करते. नक्षत्र हा टॅटू मानवाचे सौरमंडळाशी असलेले नाते दाखवते. हे सगळे टॅटू योगाशी निगडीत आहेत. योगाचा सराव करुन एक आध्यात्मिक भावना येते. हे केवळ योगिक संकेत म्हणून टॅटू काढले आहेत. मानेवर टॅटू आहे तो माझ्या नवऱ्यासाठी आहे.

>>सुवर्णरेहा चौधरी