बाप-लेकाचा मॅनहोलमध्ये दुर्दैवी मृत्यु

साामना ऑनलाईन । भिवंडी

भिवंडी शहरातील अवचित पाडा परिसरात बाप – लेकाचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. मुलगा रमेश राठोड (19) आणि वडील चंद्रकांत राठोड (50) अशी मयतांची नावं आहेत. दोघांचा मृत्यु नक्की ड्रेनेज लाईन मध्ये गुदमरून झाला की, इलेक्ट्रिक शॉक लागून झाला हे शवविच्छेदन नंतरच स्पष्ट होणार आहे.

भिवंडी शहरातील अवचित्तपाडा या ठिकाणी इम्तियाज मोमीन यांचा जवळपास शंभर म्हशींचा तबेला आहे. या तबेलातील शेण व साफसफाई करण्याचे काम चंद्रकांत राठोड करीत होते. मात्र या तबेल्याच्या साफसफाई करण्यासाठी लागणारे पाणी अनधिकृतपणे मोटार लावून वापरात नसलेल्या महापालिकेच्या ड्रेनेज लाईन मधून पंपाद्वारे घेतले जात होते. नेहमी प्रमाणे चंद्रकांत व त्यांचा मुलगा रमेश तबेल्यात पहाटे साफसफाईसाठी आले असता मोटार मधून पाणी येत नसल्याने सुरुवातीला मुलगा ड्रेनेजच्या मेनहोलमध्ये उतरला. मात्र वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने त्याचे वडील चंद्रकांत हे त्याला बघण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरले परंतू तेही बाहेर आले नाही. शेवटी तबेल्यात काम करणाऱ्या कामगारांनी पाहिले असता दोघेही बापलेक ड्रेनेज लाईन मध्ये अडकून निपचित पडल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती मिळताच तबेला मालक आणि अग्निशामक दल घटनास्थळी धाव घेतली असता ते दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना बाहेर काढून तात्काळ इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, या प्रकरणी शांतीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.