चारचौघात अपमान करतो म्हणून बापाने केला मुलाचा खून

सामना प्रतिनिधी । बदनापूर

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथील संतोष हनुमान कुरधने या 22 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुक्ष्म तपास लावून, संतोषचा मारेकरी त्याचा बाप हनुमान कुरधने हेच असल्याचे उघडकीस आले. मुलगा वारंवार चारचौघात अपमान करतो याचा राग मनात धरून आपण त्याचा खून केल्याची कबुलीही आरोपीकडून देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी 16 मे रोजी सकाळी हनुमान कुरधने यास अटक केली.

तालुक्यातील रामखेडा येथे स्वत:च्या घरात एकटा झोपलेल्या संतोष कुरधने चा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना १५ मे रोजी पहाटे उघडकीस आली होती. मूळचे नंदापूर (ता. जालना) येथील रहिवासी असलेले कुरधने कुटुंब गेल्या १० वर्षांपासून रामखेडा येथे मजुरीसाठी स्थायिक झाले आहे. आई-वडील शेजारील कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याकडे झोपण्यासाठी गेले होते. स्वत:च्या घरात एकटाच झोपलेल्या संतोषचा डोक्यात वार करून खून करण्यात आला होता.

उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत तपास केला असता संतोषचे वडील हनुमान कुरधने याच्या जबाबात तफावत आढळून आली. तसेच संतोषवर काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली होती. या दृष्टीनेही पोलिसांनी तपास केला. तसेच गावातील 16 संशयीत व्यक्तींची चौकशी केली मात्र त्यात कुठलाही पुरावा मिळाला नाही. त्यानंतर खबऱ्यामार्फत माहिती घेतली असता हनुमान कुरधने व्यसनी असल्याने कर्जबाजारी होते यातून बाप-लेकात सतत वाद होत होता, अशी माहिती मिळाली. जबाबात तफावत आणि इतर माहितीवरून पोलिसांनी आज पहाटे हनुमान यास ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला असे पोलिसांनी सांगितले.