फॅशनेबल जोडवी

संध्या ब्रीद

सौभाग्याचं लेणं समजली जाणारी ‘जोडवी’ घालण्यामागे काय तथ्य आहे हे ऐकल्यावर आश्चर्य वाटण्याखेरीज राहणार नाही.
एखाद्या सौभाग्यवतीचे सौभाग्य अलंकार म्हणजे मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, कुंकू आणि पायातील जोडवी… या चारही गोष्टी घातल्याशिवाय ती परिपूर्णच होत नाही. मात्र हे अलंकार केवळ तिच्या सौभाग्याचे प्रतीकच नाही तर ते घातल्याने इतरही अनेक फायदे होतात. आज आपण जाणून घेऊ या सौभाग्य अलंकारातील एक अलंकार म्हणजे जोडवी घातल्याने आपल्याला कोणकोणते शास्त्रोक्त फायदे होतात.

जोडवी आणि स्वस्थ गर्भाशय
पायातील अंगठ्याच्या शेजारी असलेल्या बोटामध्ये जोडवी घातली जाते. अंगठ्याच्या शेजारील या बोटामध्ये एक विशिष्ट प्रकारची नस म्हणजे शीर असते जी थेट स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत जोडलेली असते. जोडवी घातल्यामुळे या शिरेवर सतत दाब पडत राहतो आणि त्यामुळे ऍक्युप्रेशर होऊन गर्भाशयापर्यंत रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे गर्भाशयाचं कार्य नियंत्रणात राहून गर्भाशय स्वस्थ राहतं.

जोडवी आणि गर्भधारणा
मासिक पाळी नियमित झाल्यामुळे आणि गर्भाशय स्वस्थ झाल्यामुळे स्त्रीयांची प्रजनन क्षमता वाढते आणि गर्भधारणा होण्यास मदत मिळते. स्त्रीयांची जर आई होण्याची इच्छा असेल तर जोडवी हा फर्टिलिटी वाढवण्याचा उत्तम उपाय आहे. कारण जोडवीमुळे सायटिक नर्व्ह नावाच्या एका नसवर दाब पडतो. ज्यामुळे आजूबाजूच्या इतर शिरांमधील रक्तप्रवाह तीव्र होऊन गर्भाशय, ब्लेडर, आतड्या आणि हृदयापर्यंत रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि या अवयवांना स्वास्थ्य लाभते.

जोडवी आणि मासिक पाळी
वरीलप्रमाणे जोडवीचा अंगठ्याशेजारील बोटामधील शिरेवर सतत दाब पडत असल्यामुळे गर्भाशयातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे गर्भाशय स्वस्थ होऊन मासिक पाळी नियमित आणि सुरळीत होते. ज्यामुळे शारीरिक स्वास्थ्य लाभून ताणतणाव दूर होतो आणि मन प्रसन्न राहतं.

जोडवी आणि फॅशन
अलीकडे केवळ विवाहित स्त्रीयांच नव्हे तर तरुण मुलीदेखील जोडवी ज्याला फॅशन सृष्टीमध्ये ‘टो रिंग’म्हणतात घालू लागल्या आहेत. यामुळे त्यांचा मासिकपाळीसारख्या समस्यांपासून बचाव होत आहे.