इजिप्तमध्ये रेल्वे स्टेशनवर फतव्यांचे स्टॉल!

मुजफ्फर हुसेन

इस्लाम धर्मात फतव्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु वेळोवेळी विविध वादग्रस्त फतव्यांमुळे मुस्लिम समाजात मोठे गैरसमज निर्माण झालेले आहेत. आज जगभरात मुस्लिम तरुण दहशतवादाकडे वळलेला असून त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी आणि इस्लामला अभिप्रेत असलेली अहिंसा त्याच्या मनावर बिंबवण्यासाठी इजिप्त देशातील काहिरा या राजधानीच्या शहरात अल अजहर या जगप्रसिध्द विद्यापीठाने चक्क रेल्वे स्टेशनवर फतव्यांचे स्टॉल उघडले आहेत.

रेल्वे स्टेशनवर मोठय़ा प्रमाणात पोटासाठी दैनंदिन प्रवास करणा-यांची मोठी संख्या असते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी लागणाऱया प्रत्येक गरजा, वस्तूंची खरेदी-विक्री होईल, असे स्टॉलही रेल्वे स्टेशनवर असतात. अशा स्टॉलधारकांना रेल्वे प्रशासनातर्फे परवानेही देण्यात येतात. त्यामुळे रेल्वे स्टेशन हे रेल्वेच्या येण्या-जाण्याच्या वेळेपुरते जरी रेल्वे स्टेशन म्हणून असले तरी इतर वेळी मात्र ती एक बाजारपेठच झालेली असते. या बाजारपेठेत काय मिळत नाही? जवळपास प्रत्येक गोष्ट, वस्तू येथे उपलब्ध असते. त्यामुळेच असे सहजपणे म्हटले जाते की, एखादी वस्तू जर बाजारात कुठेही मिळाली नाही तर ती रेल्वे स्टेशनवर हमखास मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढी रेल्वे स्टेशनची ख्याती आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर केवळ प्रवासीच जातात असे नव्हे तर ज्यांना प्रवास करायचा नाही अशा निव्वळ ग्राहकांचाही रेल्वे स्टेशनवर हमखास वावर असतोच.

रेल्वे स्टेशनवर दैनंदिन वस्तूंची खरेदी-विक्री ही तशी सर्वसाधारण गोष्ट मानली जाते. परंतु रेल्वे स्टेशनवर जेव्हा धार्मिक गोष्टींचाही स्टॉल लागतो तेव्हा मात्र ती आश्चर्याची गोष्ट ठरते. धार्मिक पुस्तके, धार्मिक साहित्य, पूजा साहित्य आदींचे स्टॉल आपण समजू शकतो. परंतु मुस्लिमांसाठी खास फतव्यांचे स्टॉल जर रेल्वे स्टेशनवर लागलेले असतील तर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाहीच. हा काही थट्टेचा प्रकार नाही. वास्तवच आहे. ज्यांना शंका असेल त्यांनी इजिप्त या देशाची राजधानी असलेल्या काहिरा या शहरातील रेल्वे स्टेशनवर जाऊन प्रत्यक्ष पाहून खात्री करावी. या ठिकाणी फतव्यांचा स्टॉल लागलेला आहे आणि अतिशय अभ्यासू असे मौलाना येथे धर्माचा अर्थ समजावून सांगण्यासाठी उपलब्ध आहेत. काहिरा या शहरातच जगप्रसिध्द अल अजहर नावाचे प्रसिध्द विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला इस्लामी ज्ञानाच्या संदर्भात संपूर्ण जगात विशेष असे स्थान आहे. या विद्यापीठातर्फे इस्लाम धर्मातील विविध संकल्पनांबाबत ज्या व्याख्या केल्या जातात आणि जे फतवे व त्याच्या धार्मिक व्याख्या आणि त्याचा अर्थ सांगितला जातो त्याला संपूर्ण इस्लामी जगत मान्यता देते. येथील फतवे सर्वव्यापी सर्वमान्य मानले जातात. त्यांनी हे स्टॉल सुरू केले आहेत.

बंगळुरू येथून एक अतिशय प्रसिध्द उर्दू साप्ताहिक प्रकाशित होते. नशेमन असे त्याचे नाव आहे. नुकत्याच ६ ऑगस्ट २०१७ रोजीच्या नशेमनच्या अंकातून ही आश्चर्यकारक माहिती जगापुढे आली आहे. या बातमीमुळे वाचकांमध्ये एक खळबळ निर्माण झाली. या साप्ताहिकात प्रसिध्द करणाऱयात आलेल्या विशेष बातमीचे शीर्षक होते ‘‘काहिरा रेल्वे स्टेशनवर चालता फिरता फतवे घ्या!’’ या बातमीत म्हटले आहे की, मिस्त्र्ा (इजिप्त)च्या प्रसिध्द विद्यापीठ अल अजहरने जनतेला धार्मिक मार्गदर्शन मिळावे आणि दहशतवादाकडे तरुण वळू नये यासाठी रेल्वे स्टेशनवर हे स्टॉल लावण्यात आलेले आहेत. या स्टॉलवर तज्ञ इमाम उपलब्ध आहेत आणि लोक चालता चालता आपल्या धर्मविषयक शंकांचे निरसन करून घेऊ शकतात आणि धर्मासंदर्भातील फतवे घेऊ शकतात.

प्रचंड गर्दी असलेल्या या रेल्वे स्टेशनवरील स्टॉलवर सय्यद उमर नावाचे एक इमाम लोकांना विविध फतवे देत असतात ते सांगतात की, इथे आम्ही लोकांच्या धर्माविषयीच्या शंकांची उत्तरे देण्यासाठी उपलब्ध आहोत आणि तरुण दहशतवादाच्या दिशेने वळू नयेत, जे वळले आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी  आम्ही येथे आहोत. काहिराच्या मेट्रो स्टेशनवर छोटे-छोटे धार्मिक स्टॉल लावण्यात आलेले आहेत. जो कुणी येथे येऊन काही शंका विचारेल त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. जामेआ अल अजहरच्या इमामांच्या म्हणण्यानुसार या स्टॉलचा मुख्य उद्देश दहशतवादावर टीका करणे आणि इस्लामची जी चुकीची व्याख्या प्रचारित केली जाते त्यात सुधारणा करणे हा आहे. ही एक मोहीम आहे आणि विद्यापीठाने ती हाती घेतली, या मागे कारणही तसेच आहे. इजिप्त लष्कराने इजिप्तच्या सिनाई क्षेत्रात सक्रिय जिहादी दहशतवाद्यांचा गट दाईशच्या विरोधात लष्करी कारवाई केली. त्यावेळी युवक भरकटले असल्याचे लक्षात आले. पुन्हा तरुण अशा मार्गाला जाऊ नये म्हणून विद्यापीठाने ही मोहीम हाती घेतली आहे.

इजिप्तमध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक आहेत. त्यांच्याविरोधात हे जिहादी सक्रिय होते. जिहादी आणि ख्रिश्चन यांच्यातील संघर्षात असंख्य लोक ठार झाले. एवढेच नव्हे तर इजिप्तच्या सुरक्षा विभागातील २८ पेक्षा अधिक अधिकारीही मारले गेले आहेत. हा संघर्ष लक्षात घेता या विद्यापीठाने रेल्वे स्टेशनवर हे स्टॉल लावले असून त्याद्वारे त्यांनी इजिप्तच्या जनतेपर्यंत आपला संदेश दिलेला आहे. सय्यद उमर यांच्या म्हणण्यानुसार काही अपात्र असलेल्या लोकांनी प्रसिध्द केलेले फतवे मान्य केल्याने तरुण भरकटले आहेत. तरुणांना जे प्रश्न पडतात त्याची उत्तरे देताना आम्ही पवित्र कुराणमधील आयतींचा आधार घेतो आणि त्याचा संदर्भ देऊनच उत्तर देतो. उत्तर देताना याबाबत सावध असतो की, युवकांच्या मनामध्ये काही भ्रम आणि अतार्किक गोष्टींचा पूर्वगृह बसलेला आहे. त्यातून त्यांना बाहेर काढून त्यांना वस्तुस्थिती सांगायची आहे. आम्ही सातत्याने हे सांगत आलो आहोत की, इस्लाम हा शांततेचा आणि बंधुभावाचा धर्म आहे. येथे कोणतीही गोष्ट लपवली जात नाही आणि एखादी गोष्ट चुकीच्या पध्दतीने सांगितलीही जात नाही. जामेआ अल-अजहर हे जगप्रसिध्द विद्यापीठ आहे. जेव्हा या विद्यापीठाच्या वतीने काही सांगितले जाते तेव्हा ते पूर्णपणे खात्री करून आणि सर्व पुराव्यानिशी सांगितले जाते. प्रत्यक्षात आम्ही स्वतः आमच्याकडून काहीच सांगत नाही, केवळ पवित्र कुराणच्या आयतींच सादर करीत असतो. ज्यांचा अरबी भाषेचा आणि इस्लामी साहित्याचा सखोल अभ्यास असतो केवळ अशांनाच आम्ही लोकांपुढे आणतो. यात कुणीही हस्तक्षेप करीत नाही. अल अजहर विद्यापीठ कायम वादविवादापासून दूर असते. या संदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण घेण्यात आले. अनेक लोकांनी या प्रयोगाचे मोठे कौतुकही केले. परंतु काही लोकांना असेही वाटते की, या प्रयोगामागचा हेतू जरी चांगला असला तरी त्याची पध्दत योग्य नाही. ही अतिशय उथळ आणि बटबटीत कार्यपध्दती आहे. अशी टीका केली जात आहे. परंतु अशा प्रकारची टीका होत असतानासुध्दा इस्लामविषयी मार्गदर्शन करणे आणि फतव्यांचे स्टॉल लावणे सुरूच आहे. त्यात काही फरक पडलेला नाही.